छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि एकूण परिसराचा कायापालट होणार आहे. पुढील पाचशे वर्षांपर्यंत टिकेल, असे काम केले जाणार असल्याचा दावा केला जात आहे. बांधकामासाठी चुन्याचा वापर करून दगडी पाषाणात मराठा वास्तुशैली अमलात आणली जाणार आहे. जागतिक पातळीवरील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून तुळजापूर शहराला नवी ओळख या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून मंदिर कळसाबरोबरच छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचे तुळजाभवानी मातेचे १०८ फूट उंचीच्या भव्य शिल्पाचेही दर्शन भाविकांना होणार आहे. एक हजार ८६६ कोटी रुपयांच्या या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने नुकताच हिरवा कंदील दिला आहे.
मंजूर निधीतून सूक्ष्म, मध्यम आणि मोठे, अशा तीन टप्प्यांत काम करण्यात आले आहे. मोठ्या कामांच्या टप्प्यात रस्त्यांचा विस्तार, रस्तेजोडणी या कामाला आराखड्याच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे, तर मध्यम स्वरूपाच्या कामात गावातील विविध तीर्थकुंडांचे नूतनीकरण आणि तुळजापूर शहरात असलेल्या छोट्या-मोठ्या सर्व मंदिरांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सूक्ष्म स्वरूपाच्या कामांमध्ये स्थानिक रहिवासी, पुजारी बांधव, व्यापारी आणि देशभरातून जगदंबेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. यात व्यवस्थापनाबरोबरच प्रथमोपचार, विश्रांती व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदी सोयीसुविधांबद्दल अत्यंत सूक्ष्म पद्धतीचे नियोजन आहे. देवीच्या दर्शनासाठी पूर्वी जे मार्ग वापरले जात होते त्याच मार्गांचा अवलंब यापुढेही केला जाणार आहे. भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे याकरिता आकर्षक पद्धतीने छत घातले जाणार आहे.
तीन ठिकाणी भाविक सुविधा केंद्र
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, त्याचबरोबर लातूर आणि सोलापूर अशा विविध मार्गांवरून भाविक तुळजापूर नगरीमध्ये दाखल होतात. दररोज साधारणपणे पन्नास हजार भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येतात. यात्रा काळात ही संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात असते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आराधवाडी, घाटाशीळ आणि हडको परिसरात तीन अद्ययावत सुविधांचे भव्य केंद्र साकारली जाणार आहेत. यात हिरकणी कक्ष, उपाहारगृह, वाहनतळ व्यवस्था, स्नानगृह, तिकीट व प्रसाद वाटपाची खिडकी, प्रथमोपचार केंद्र आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शहरातील मुख्य मार्गावर भव्य स्वागत कमानी
तुळजापुरातील प्रमुख रस्त्यांवर चार ठिकाणी भव्य स्वागत कमानी साकारण्यात येणार आहेत. भाविकांना जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाचा आनंद मिळावा या हेतूने आपण हा आराखडा अंतिम करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंजुरी दिली.
राणा जगजितसिंह पाटील, आमदार तथा ‘मित्र’चे उपाध्यक्ष