विदर्भ आणि मराठवाडा असा शब्द जोडून म्हणताना मराठवाडय़ाच्या वाटय़ाला विकासाच्या योजना फारशा पोहोचल्या नसल्या तरी मराठवाडय़ातील भाजपची ताकद एका जागेने वाढलेली होती. २०१४च्या तुलनेत २०१९ मध्ये १६ जागा मिळविणाऱ्या भाजपला रोखता यावे म्हणून सरकारने यावेळी पाच कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री पदे मराठवाडय़ाला दिली आहेत. काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि अमित देशमुख हे दोघेजण कॅबिनेट मंत्री झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेला मात्र मराठवाडय़ातील मंत्र्यांची निवड करताना बरीच कसरत करावी लागली, असे दिसून येत आहे. ज्या दोन जिल्ह्य़ांत सेनेला सर्वाधिक यश मिळाले त्यातील उस्मानाबाद जिल्ह्य़ाला शिवसेनेने एकही पद दिले नाही. परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जिल्ह्य़ांतील आमदारांपैकी कोणालाही मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा शपथविधीनंतर हिरमोड झाला.

लातूर आणि नांदेड जिल्ह्य़ात काँग्रेसची ताकद पूर्वीही होती आणि या निवडणुकीतही ती टिकवून धरण्यात अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांना यश मिळाले होते. नांदेड जिल्ह्य़ात काँग्रेसचे चार आमदार आहेत. तर लातूरमध्येही देशमुखांना गड राखता आला. त्यामुळे अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्यावर मराठवाडय़ातील इतर जिल्ह्य़ातील जबाबदारी दिली जाईल.

अशोक चव्हाण यांनी पहिल्याच दिवशीच मराठवाडय़ाचे विकासाचे प्रश्न लावून धरले जातील असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडय़ात २०१४च्या तुलनेत तेवढय़ाच म्हणजे आठ जागाच २०१९ मध्ये राखता आल्या. शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारानंतरही केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले.

नव्याने मंत्री झालेल्या राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांच्यावर अनेक जिल्ह्य़ातील संघटनात्मक वाढीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, असे सांगण्यात येत आहे. राजेश टोपे हे सहाव्यांदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत, तर धनंजय मुंडे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली असून काँग्रेसमधून भाजपामार्गे शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री केले. मंत्री तानाजी सावंत यांना वगळण्यात आले आहे. ते कोणत्या कारणासाठी याचा शिवसैनिक शोध घेत होते.

जावई माझा भला :  उस्मानाबाद जिल्ह्य़ाला एकही मंत्रीपद मिळाले नसले तरी या जिल्ह्य़ाचे तीन जावई उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे आणि प्राजक्त तनपुरे हे उस्मानाबादचे जावई आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर उस्मानाबादकर ‘जावई माझा भला’ असे घोषवाक्य समाजमाध्यमातून फिरू लागले.