BLOG : ‘धर्मवीर’ चित्रपट एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या रणनीतीचा भाग की योगायोग?

‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले.

Shivsena leader eknath shinde dharmveer movie connection

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणि प्रचंड उलथापालथ सुरू आहे. शिंदेंनी पुकारलेलं हे बंड शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अनाकलनीय होतं, असंच म्हणावं लागेल. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात राजकीय वादळ आले आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अचानक नॉट रिचेबल झालेले एकनाथ शिंदे आधी गुजरात आणि नंतर थेट गुवाहाटीला पोहोचले. आधी १९ मग ३३ आणि आता तब्बल ४० शिवसेनेचे आमदार आणि ९ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत. दिवसागणिक एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्ल्यू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे गटाच्या निर्णयावर राज्यातील महाविकास आघाडी आणि राजकारणाची गणितं अवलंबून आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. त्यामुळेच शिंदे काय निर्णय घेणार याकडेच राजकारण्यांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटात अभिनेता क्षितीश दातेने एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली आहे. (फोटो : क्षितीश दाते/ इन्स्टाग्राम)

गेल्या ६-७ दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मात्र गेल्या महिनाभरापासूनच समाजमाध्यमे आणि एकूणच सगळीकडे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आणि एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. शिवसेनेची पाळेमुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात रोवणारे आनंद दिघे ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जायचे. आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या आणि जवळच्या व्यक्तींपैकी एक असे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे. ‘धर्मवीर’ चित्रपटातही हे ठसठसीतपणे दिसतं. चित्रपटाच्या प्रमोशनपासूनच एकनाथ शिंदे चर्चेत आले होते. धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीतच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा ते केंद्रबिंदू ठरले आहेत.

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. (फोटो : क्षितीश दाते/ इन्स्टाग्राम)

‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा रंगली होती. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील संवादाच्या व्हिडीओ क्लिप्सही समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवादांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रसंगावेळी आनंद दिघेंच्या “तुमचा पक्ष असा उभा आहे. आमचा पक्ष म्हणजे वज्रमुठ आहे. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार नाही” असा विश्वास दाखवताना प्रतिस्पर्ध्याने दिलेलं उत्तर जणू महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आरसा दाखवते. दिघेंच्या या वाक्यावर कॉंग्रेसचे वसंत डावखरे “पण या मुठीतून एकाला बाहेर यायचे असेल तर…”, असा प्रश्न उपस्थित करतात. शिंदेंनी पुकारलेलं हे बंड चित्रपटातील या प्रसंगाची आठवण करून देते. दुसरा प्रसंग म्हणजे आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये असताना राज ठाकरे त्यांना भेटायला येतात. तेव्हा दिघे त्यांना ‘साहेब तुम्ही आणि उद्धव महाराष्ट्राचे भविष्य आहात’, असं म्हणतात. आता उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदेंनी पुकारलेलं बंड त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये असताना राणेंनी त्यांच्यासोबत साधलेला संवाद मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचा प्रसंग. (फोटो : क्षितीश दाते/ इन्स्टाग्राम)

धर्मवीर चित्रपटात अनेक प्रसंगातून एकनाथ शिंदेंचं वलय, त्यांचं अस्तित्व दाखवण्याचाही प्रयत्न केला गेला आहे, हे नाकारून चालणार नाही. पिंडाला कावळा शिवतानाचा प्रसंग असो अथवा हॉस्पिटलला आग लागल्यानंतर तिथून दिंघेंच्या मृतदेहाला बाहेर काढतानाचा प्रसंग असो. डान्स बार बंद करतेवेळी शिंदेंनी केलेला राडा, गुरुपौर्णिमा गाण्यातील आनंद दिघेंनी बाळासाहेबांसमोर ‘हे ठाण्याचं भविष्य आहेत’ असा शिंदेंचा केलेला उल्लेख किंवा शिंदेंच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी असा त्यांच्या लहान मुलांच्या अपघाती मृत्यूचा प्रसंग…चित्रपटातून शिंदेंचं वेगळं स्थान निर्माण करतात. त्यामुळे ‘धर्मवीर’ चित्रपट एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या रणनीतीचा भाग होता की योगायोग?, असा प्रश्न चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.    

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra politics crisis shivsena leader eknath shinde rebel and dharmveer movie connection kak

Next Story
मृत्यूचा सोहळा : फनरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी