समीर जावळे

Uddhav Thackeray and Eknath Shidne : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातून विस्तव जात नाही हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. २०२२ च्या जून महिन्यात एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बरोबर घेऊन थेट शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान निर्माण केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे गडगडलं. एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणारीच ही घटना होती. यानंतर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘गद्दार’, ‘एसंशि’ असा खास टोमण्यांनीच केला जातो. तर एकनाथ शिंदेही फेसबुक लाइव्ह करणारा मी नाही, घरात बसून राहणारा मी नाही म्हणत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात. मागच्या तीन वर्षांत हे दोघं आमनेसामने आलेले नाहीत. पण दोघांमधले वाद चांगलेच रंगले आहेत. मात्र विधान परिषदेतला १६ जुलैचा दिवस राजकारणात कधीही विसरला जाणार नाही असाच ठरला आहे. याचं कारण या दोघांचं समोरा समोर येणं.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने

एकनाथ शिंदेंनी जेव्हापासून शिवसेनेत बंड केलं आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं तेव्हापासून उद्धव ठाकरेंचा अनेकदा सात्विक संताप झाला आहे. माझा पक्ष चोरला, वडील चोरले पण गद्दार हा गद्दारच असतो असं उद्धव ठाकरे मागच्या अडीच ते तीन वर्षांत अनेकदा म्हणाले आहेत. हे दोघंही एकमेकांचे चांगले सहकारी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळात होते. पण नंतर पक्षफुटीनंतर परिस्थिती किती चिघळली आणि बिघडली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. विधान परिषदेत जेव्हा काही मिनिटांसाठी हे दोघं समोरासमोर आले तेव्हा त्यात नाट्य घडणार यात शंकाच नव्हती. तसंच ते घडलंही.

१६ जुलैला विधान परिषदेत काय घडलं?

१६ जुलैच्या दिवशी अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. २९ ऑगस्टला अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपतो आहे त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम विधान परिषदेत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भाषणं पार पडली. अंबादास दानवे यांनीही भाषण केलं. ही भाषणं तर खुमासदार झालीच. पण त्यानंतर झालेलं फोटो सेशन चांगलंच चर्चेत राहिलं. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान परिषदेतील आमदारांचं फोटो सेशन पार पडलं. त्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे आल्यानंतर सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या.

उद्धव ठाकरे फोटो सेशनसाठी येताच काय घडलं?

उद्धव ठाकरे फोटो काढण्यासाठी विधान परिषदेच्या पायऱ्यांवर आले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी हस्तांदोलन केलं. यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खुर्चीत बसण्याची आणि बरोबर फोटो काढण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे खुर्चीकडे वळले आणि समोर एकनाथ शिंदे उभे होते. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाहताच नजर वळवली आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केलं. तितक्यात तिथे अंबादास दानवे उद्धव ठाकरेंजवळ आले आणि त्यांना आपल्यापाशी बसण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे तिथेच उभे होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला नीलम गोऱ्हे होत्या त्यांनी खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरेंनी स्मित हास्य केलं. एकनाथ शिंदेंनी दोन वेळा चष्मा सरळ केला आणि नजर उद्धव ठाकरेंकडे वळवलीही नाही. उद्धव ठाकरे स्मित हास्य करत नीलम गोऱ्हेंच्या शेजारी बसले. त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे असे तीन नेते एकाच फ्रेममध्ये दिसले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या इतक्या मोठ्या फुटीनंतर एकाच फ्रेममध्ये दिसणं हा राजकारणातला ‘कपिला षष्ठी’चा योगच मानला जातोय. कपिला षष्ठीचा योग ६० वर्षांनी एकदा येतो इतका दुर्मीळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा योग तीन वर्षांनीच आला.

शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.

नाट्यमय प्रसंग आणि एका खास गाण्याची आठवण

एक फोटो हजार शब्दांचं काम करतो असं म्हणतात. पण विधान परिषदेतल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याच्या काही मिनिटांच्या या दृश्यांनी एका गाण्याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ‘गुपचूप गुपचूप’ या एक गाणं आहे. कुलदीप पवार हे गीत रंजना यांच्यासाठी म्हणत असतात असं दाखवण्यात आलं आहे. सुरेश वाडकरांनी हे गाणं गायलं आहे. ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले..’ असे या गाण्याचे बोल आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही काही क्षणांची दृश्यं पाहून हे गाणंच कदाचित महाराष्ट्राच्या मनात रुंजी घालत असेल.