महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र यावे असा सल्ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होता. या सल्ल्याबाबत तुमचे मत काय असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी केवळ दोन शब्द वापरले. ते म्हणजे ‘जय महाराष्ट्र’. त्यांच्या या उत्तरामुळे शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासोबत सकारात्मक नाही असे दिसत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांसोबत आज उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या बैठकीमध्ये काय झाले याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी आज अभिनंदनासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचे म्हटले.
नगरसेवकांना महापौरपदाचे मतदान कसे करावे याबाबत आपण मार्गदर्शन केले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. महापौर पदासाठी कोण उमेदवार आहे असे विचारले असता त्यांनी वाट पाहण्याचा सल्ला दिला.
याआधी शिवसेना नेते अनिल परब यांना देखील नितीन गडकरींनी दिलेल्या सल्ल्याबाबत तुमचे मत काय असे विचारले गेले होते, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने हा निर्णय आधी घ्यायला हवा. युती तुटल्यानंतर हे शहाणपण सुचून काय उपयोग आहे असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या बोलण्यावरुन देखील असे स्पष्ट होत आहे की शिवसेना भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत नाही. काँग्रेसला राज्यातील सरकार पाडायचे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी एकत्र यावे असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यांच्या या सल्ल्यावर उद्धव ठाकरे यांनी जय महाराष्ट्र असे उत्तर दिले आहे. दरम्यान, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये युती घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दोन्ही पक्ष परत एकत्र येतील असा आपणास विश्वास वाटतो असे ते म्हणाले.