Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच, आता आमदार बच्चू कडू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून एक मोठं विधान केलं आहे. अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू म्हणाले, अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांना या सरकाचा आरसा असतो, ते तुम्ही द्या. अर्थसंकल्पीय भाषणाचे अनेक किस्से असेच आहेत, की भाषण खूप मोठं असतं परंतु कृतीमध्ये किती येतं, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून यामध्ये काही समाधानकारक गोष्टी आहेत. अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे, असं मी म्हणेण पण यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याचा भाग सुटलेला आहे. बेघरांच्या घरांचा भाग सुटलेला आहे. मजुरांचा भाग सुटलेला आहे. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी फार अशी तरतूद दिसत नाही.

याचबरोबर, सगळ्यात मोठी दु:खाची गोष्ट अशी आहे, की अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला आहे. कुसुमाग्रज म्हणत होते भाषा मरते आणि त्यासोबतच देशही मरत असतो. या देशाची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे आणि लोहिया असे म्हणायचे की, ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या भाषेत तुम्ही सभागृहात बोललं पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला ते समजेल. म्हणून पंतप्रधान मोदींना आम्ही पत्र लिहिणार आहोत की पुढील वर्षीचं बजेट हे हिंदीमधून आलं पाहिजे. कारण, आपण या देशाच्या संस्कृतीचे पुरस्करते आहोत. असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

याशिवाय, भाजपा म्हटलं की लोकांच्या डोक्यात येतं हा संस्कृती चालवणारा पक्ष आहे. या देशाची भाषा इंग्रजी नाही. उद्या जर राज्याचा अर्थसंकल्प हिंदीमधून मांडला तर? राज्याचं काय होईल. म्हणून या देशाच्या संसदेत जे काही शब्द निघतात ते सामान्य माणसाला सरळ समजले पाहिजेत. तुम्ही अर्थसंकल्प इंग्रजीमधून मांडल्याने राष्ट्रभाषेचा अवमान झालेला आहे. या अवमानाची दुरुस्ती आपण केली पाहिजे, पुढीलवेळी तुम्हाला जर हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून तो अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून तरी इंग्रजी बोला. कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहोत. राष्ट्र प्रथम वंदे मातरम्… म्हणू याची सुधारणा लोकसभेत झाली पाहिजे, अशी विनंती सुद्धा मी या निमित्त करतो. असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2023 bachu kadu criticized for presenting the union budget in english msr