मुंबई : भांडवली बाजारातील ब्लू-चिप बँकांच्या समभागांमधील तेजी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सलग चौथ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

दिवसअखेर सेन्सेक्स १३६.६३ अंशांनी वधारून ८१,९२६.७५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५१९.४४ अंशांची कमाई करत ८२,३०९.५६ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टीमध्ये ३०.६५ अंशांची वाढ झाली आणि तो २५,१०८.३० पातळीवर बंद झाला.

अनुकूल जागतिक संकेत आणि आगामी तिमाही आर्थिक कामगिरीच्या वाढीच्या अपेक्षांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी समाधानकारक राहिली नसली तरीही तिसऱ्या तिमाहीत संभाव्य पुनर्प्राप्तीच्या आशेने बाजारात प्रमुख निर्देशांक वधारले.

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर वित्त क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले आहेत, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक वधारले. तर अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, ट्रेंट आणि इन्फोसिसच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ५,०३६.३९ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.