सोन्याच्या भावाने दिल्लीतील सराफा बाजारपेठेत मंगळवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सोन्याचा भाव तोळ्याला (प्रति १० ग्रॅम) ५ हजार ८० रुपयांची उसळी घेऊन १ लाख १२ हजार ७५० रुपयांवर पोहोचला. २०२५ सालात आतापर्यंत सोन्याच्या भावात ४३ टक्के वाढ झाली आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सराफा बाजारपेठेत शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला सोमवारी १ लाख ७ हजार ६७० रुपये होता. हा भाव मंगळवारी १ लाख १२ हजार ७५० या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. सोन्याच्या भावात चालू वर्षात ४३ टक्के म्हणजेच ३३ हजार ८०० रुपये वाढ झालेली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रति १० ग्रॅमला ७८ हजार ९५० रुपयांवर सोने होते. दिल्लीतील बाजारपेठेत चांदीचा भाव किलोमागे २,८०० रुपयांनी वधारून १ लाख २८ हजार ८०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या भावाने उच्चांकी झेप घेतली असून, प्रति औंस ३ हजार ६५९ डॉलरवर तो पोहोचला आहे. मागील सत्राच्या तुलनेत भावात ०.४६ टक्का म्हणजेच १६.८१ डॉलरची वाढ झाली आहे. अमेरिकेतील कामगार क्षेत्राची कमकुवत आकडेवारी समोर आली असून, यामुळे तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून पतधोरणात शिथिलता येण्याची शक्यता आहे. अर्थात व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे डॉलरच्या भावातील घसरणीचा फायदा सोन्याला होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याकडे वळत आहेत.
सोन्याच्या भावाने यावर्षी अनेक उच्चांक स्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात यंदा ३५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली मागणी, एक्स्चेंज ट्रेडेड फंडातील ओघ आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता यामुळे सोन्याच्या भावातील तेजी कायम आहे.- सौमिल गांधी, वरिष्ठ विश्लेषक, एचडीएफसी सिक्युरिटीज
लांबत चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर भूराजकीय तणाव कायम आहेत. त्यातच अमेरिकेच्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याला पसंती दिली जात आहे.- त्रिवेश डी, मुख्य कार्यपालन अधिकारी, ट्रेडजिनी