सरलेल्या सप्टेंबर महिन्यात भारताची निर्यात ६.७४ टक्क्यांनी वाढून ३६.३८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर याच महिन्यांत आयातही १६.६ टक्क्यांनी वाढली. परिणामी दोहोंतील तफावत असलेली व्यापार तूट ३१.१५ अब्ज डॉलर पातळीवर पोहोचली, जी विद्यमान आर्थिक वर्षातील सर्वात मोठी आणि ११ महिन्यांच्या उच्चांकी तूट आहे. भारतीय रुपयात तुटीने २,८३,४५७ रुपयांचा टप्पा गाठला आहे.

सोने, खते आणि मुख्यतः चांदीची आयात वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये देशाची आयात ६८.५३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ५८.७४ अब्ज डॉलरवर मर्यादित होती.

विद्यमान आर्थिक वर्षातील एप्रिल-सप्टेंबर या सहा महिन्यात निर्यात ३.०२ टक्क्यांनी वाढून २२०.१२ अब्ज डॉलरवर पोहोचली, तर आयात ४.५३ टक्क्यांनी वाढून ३७५.११ अब्ज डॉलर पोहोचली. ज्यामुळे या सहा महिन्यात व्यापार तूट १५४.९९ अब्ज डॉलरवर गेली आहे.

जागतिक पातळीवर आर्थिक अस्थिरता असूनही, भारताची वस्तू आणि सेवा निर्यात चांगली वाढली आहे. मुख्यत्वे भारताने प्रमुख व्यापार भागीदार देशांशी वाणिज्य संबंध दृढ केल्याने आणि त्या परिणामी पुरवठा साखळी मजबूत झाल्याने एकंदर निर्यात वाढली आहे, असे केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काच्या परिणामाबद्दल ते म्हणाले की, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय वाढीव आयात शुल्काच्या परिणामांचा सध्या आढावा घेत आहे. अमेरिकेला भारतातून होणाऱ्या निर्यातीपैकी ४५ टक्के निर्यात अजूनही या उच्च आयात शुल्काच्या कक्षेबाहेर आहे. मात्र अमेरिकेने ५० टक्के शुल्क आकारलेल्या ५५ टक्के उत्पादनांवर याचा परिणाम निश्चितच होईल, असेही अग्रवाल म्हणाले.