पीटीआय, नवी दिल्ली
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये प्रवर्तक गटाने १५,८२५ कोटी रुपयांचा निधी ओतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्राधान्याने परिवर्तनीय वॉरंट जारी करून निधी उभारणीस मान्यता दिली आहे. अंबानी कुटुंब आणि विविध गट धारक संस्थांसह जिओ फायनान्शियल प्रवर्तकांकडे कंपनीचा ४७.१२ टक्के हिस्सा आहे. आता आणखी निधी ओतल्यानंतर प्रवर्तकांचा हिस्सा ५४.१९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति समभाग ३१६.५० रुपये या किमतीत रोख रकमेसाठी ५० कोटीपर्यंत वॉरंट जारी करून निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली. जिओ फिनमध्ये आता सिक्का पोर्ट्स अँड टर्मिनल्स लिमिटेडची कंपनीतील हिस्सेदारी १.०८ टक्क्यांवरून ४.६५ टक्क्यांपर्यंत वाढेल तर जामनगर युटिलिटीज अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी २.०२ टक्क्यांवरून ५.५२ टक्क्यांपर्यंत दुप्पट होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (जेएफएसएल) जून २०२५ रोजी अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३१३ कोटी रुपयांवर होता. कंपनीचे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या जून तिमाहीत ४१८ कोटी रुपयांवरून ६१९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत, व्याज उत्पन्न दुप्पट होऊन ३६३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १६२ कोटी रुपये होते.एकूण खर्च गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ७९ कोटी रुपयांवरून २६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून तयार केलेली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस गुंतवणूक आणि वित्तपुरवठा, विमा ब्रोकिंग, पेमेंट बँक आणि पेमेंट अॅग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे सेवांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. मुंबई शेअर बाजारात जिओचा समभाग बुधवारच्या सत्रात ३२०.३० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,०३,४९१ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे समभाग खरेदी करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. स्वतः कंपनीचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही.)