मुंबई : गुंतवणूकदारांनी पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अँड टुब्रोचे समभाग खरेदी करण्याचा सपाटा लावल्यामुळे बुधवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक वाढीसह बंद झाले.

सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवत बुधवारअखेर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४३.९१ अंशांनी वधारून ८१,४८१.८६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने फक्त २८१.०१ अंशांची कमाई करत ८१,६१८.९६ या सत्रातील उच्चांकी पातळी स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३३.९५ अंशांची वाढ झाली आणि तो २४,८५५.०५ पातळीवर बंद झाला.

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे. परिणामी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक अरुंद श्रेणीत व्यवहार करत आहे. गुंतवणूकदारांनीही पहिल्या तिमाहीच्या निकालांवर आधारित विशिष्ट कंपनी आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. एल अँड टीच्या चांगल्या तिमाही कामगिरीनंतर औद्योगिक क्षेत्राला गती मिळाल्याचे दिसत आहे. व्यापार करारासंबंधित दबावामुळे वाहन निर्माण क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक राहिली. गुंतवणूकदारांनी आता अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेड’च्या पतधोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. कारण व्याजदर आणि महागाईवरील त्यांची भूमिका जागतिक भावनांवर परिणाम करू शकते, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

अमेरिकेच्या व्यापार करारातील अनिश्चितता आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे निर्देशांकातील वाढ मर्यादित राहिली, असे विश्लेषकांनी सांगितले. बुधवारच्या सत्रात सन फार्मा, एनटीपीसी, मारुती, भारती एअरटेल, ट्रेंट आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग तेजीत होते. तर सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक घसरला. त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,६३६.६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

  • सेन्सेक्स ८१,४८१.८६ १४३.९१ ( ०.१८%)
  • निफ्टी २४,८५५.०५ ३३.९५ ( ०.१४%)
  • तेल ७२.१९ ०.४४%
  • डॉलर ८७.४३ ५२ पैसे