मुंबई : भारतात केवळ मूठभर उद्योगच गुंतवणूक करत असून, उत्पादनांच्या मागणीत वाढ नसणे हे चिंतेचे कारण असल्याचे प्रतिपादन जेएसडब्ल्यू समूहाचे नव्या पिढीचे शिलेदार पार्थ जिंदाल यांनी सोमवारी येथे केले. खासगी भांडवली गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरण होणे नितांत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सीमेंट, पोलाद, बंदरे आणि क्रीडा क्षेत्रात रस असलेल्या आणि मुंबईत मुख्यालय असलेल्या या उद्योग समूहाचा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास आहे आणि पुढील पाच वर्षांत ५० अब्ज डॉलरची गुंतवणुकीचे समूहाचे नियोजन आहे, असे सज्जन जिंदल यांचे ३५ वर्षीय पुत्र पार्थ यांनी येथे पत्रकारांना सांगितले.

प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) घेऊन दाखल झालेल्या जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक जिंदाल यांनी भारतात गुंतवणूक आणि उत्पादन वाढण्याची गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी जमीन अधिग्रहण आणि कामगार कायदे यांसारख्या आव्हानांकडेही लक्ष वेधले. या गोष्टी प्रतिकूल असून त्या गुंतवणुकीला अडथळा ठरत आहेत, असे ते म्हणाले.

आज भारतात गुंतवणूक करणारे काही मोजकेच समूह आहेत. खासगी कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद खूप मजबूत आहे, परंतु तरीही त्या गुंतवणूक करू पाहात नाहीत. अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक सुस्थित असताना आणि सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ केली असताना देखील असे घडणे हे सरकारसाठी गोंधळात टाकणारे आहे. गुंतवणूक करू शकतील अशा अधिकाधिक सक्षम सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची (एमएसएमई) आपल्याला आवश्यकता आहे. मात्र अनेक खासगी कंपन्या क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करण्याऐवजी त्यांचा कर्जभार कमी करण्याचा किंवा कर्ज फेडण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत, असे ते खेदाने म्हणाले.

जेएसडब्ल्यू सिमेंटने प्रस्तावित ‘आयपीओ’साठी प्रति समभाग १३९ रुपये ते १४७ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. ज्यामुळे या १७ वर्षे जुन्या कंपनीचे मूल्यांकन हे किंमत पट्ट्याच्या वरच्या टोकानुसार २०,००० कोटी रुपये होईल. ‘आयपीओ’मध्ये १,६०० कोटी रुपयांच्या समभागांची नव्याने विक्री आणि सध्याचे भागधारक हे ‘ऑफर फॉर सेल’द्वारे त्यांनी धारण केलेल २००० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्रीला काढणार आहेत. येत्या ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान ही विक्री खुली असेल.