मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या उपकंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहून जलद काम करावे, अशा सूचना केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी शुक्रवारी दिल्या.
कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या सूचिबद्धतेच्या समारंभात बोलताना नागराजू म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील विभागांतर्गत १०० हून अधिक संस्था आणि उपकंपन्या कार्यरत आहेत. यामुळे ज्या सरकारी कंपन्यांच्या उपकंपन्यांनी अद्याप प्रारंभिक समभाग विक्री केलेली नाही त्यांनी त्यादिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना आयपीओचे महत्त्व देखील समजावून सांगितले.
सूचिबद्धतेमुळे भागधारकांना गुंतवणुकीचे मूल्य मिळण्यास मदत होते आणि कंपन्यांना नियामक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत असल्याने सुयोय्य कारभाराचे (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) मानक सुधारण्यास मदत होते. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यासारख्या अनेक मोठ्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या समयी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते, त्यांना उद्देशून नागराजू यांनी सरकारच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या.
नागराजू म्हणाले की, बँकांनी लवकरात लवकर त्यांच्या उपकंपन्यांची यादी तयार करावी आणि सूचिबद्धतेच्या दिशने पावले उचलावीत. जेणेकरून देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील भागधारक या मूल्य निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतील. सूचिबद्धतेनंतर, कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्सचा समभाग शुक्रवारी ५.११ टक्क्यांनी वधारून १११.४२ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे १,०१,०६५ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.