मुंबईः मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील दोन सर्वात श्रीमंत आणि प्रमुख उद्योजक… दोहोंमधील स्पर्धा, चढाओढीचे प्रसंगही अनुभवास येतात. दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण, हेही पाहणे मग औत्सुक्याचे ठरेल. प्रत्यक्षात अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अंबानी कुटुंबियांकडे सुमारे २८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी देशातील दुसरे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कुटुंबियांच्या १४.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा दुप्पट आहे, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने स्पष्ट केले.

भारतातील बड्या ३०० सर्वात धनाढ्य कुटुंबांची संपत्ती १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (१४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे, जी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. एकट्या अंबानी कुटुंबाची संपत्ती देशाच्या जीडीपीच्या १२ टक्के भरेल इतकी आहे.

गेल्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली आणि देशातील सर्वात धनवान उद्योगघराणे म्हणून त्याने स्थान टिकवून ठेवले, असे बार्कलेजच्या सहकार्याने ‘हुरून इंडिया’ने तयार केलेल्या अहवालाने नमूद केले. गौतम अदानी यांचा मात्र पहिल्या पिढीतील उद्योजकाचे सर्वात मौल्यवान उद्योगघराणे असा लौकिक आहे.

गेल्या वर्षी कुमार मंगलम बिर्ला कुटुंबियांची संपत्ती २० टक्क्यांनी वाढून ६.४७ लाख कोटी रुपये झाली. ज्यामुळे उद्योगघराण्यांच्या कौटुंबिक संपत्तीच्या यादीत ते एका स्थानाने वर जाऊन दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत, तर जिंदाल कुटुंबाची संपत्ती २१ टक्क्यांनी वाढून ५.७० लाख कोटी रुपये झाली, असे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे बजाज कुटुंब हे या यादीत एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आले आहे. कारण बजाज यांच्या संपत्तीत २१ टक्के घट होऊन ती ५.६४ लाख कोटी रुपयांवर उतरली आहे.

देशातील पहिल्या ३०० श्रीमंत कुटुंबांनी गेल्या वर्षी दररोज ७,१०० कोटी रुपये संपत्तीत वाढ केली आहे. अहवालानुसार, देशातील १ अब्ज डॉलर (सुमारे ८,७०० कोटी रुपये) पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कुटुंबांची संख्या आता त्यामुळे ३७ ने वाढून १६१ झाली आहे. या यादीतील एक चतुर्थांशपेक्षा अधिक कुटुंबांकडील उद्योग-व्यवसाय हे भांडवली बाजारात सूचिबद्ध नाहीत, असे त्यात म्हटले आहे. यातील फक्त ११ टक्के व्यवसाय हे सेवा-केंद्रित आहेत, तर उर्वरित ८९ टक्के उत्पादनांची निर्मिती करतात. श्रीमंत कुटुंबीयांपैकी एकट्या मुंबईत सर्वाधिक ९१ अतिश्रीमंत कुटुंबे राहतात, त्यानंतर दिल्लीमध्ये ६२ आणि कोलकात्यामध्ये २५ कुटुंबे स्थायिक आहेत.

अंबानी उद्योगघराण्याच्या मालकीच्या कंपन्या

१. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
२. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
३. जस्ट डायल लिमिटेड
४. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
५. नेटवर्क१८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
६. डेन नेटवर्क्स लिमिटेड
७. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड
८. हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड
९. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड
१०. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड
११. रिलायन्स न्यू एनर्जी व्हेंचर्स
१२. रिलायन्स जनरल इन्शुरन्स

अदानी उद्योगघराण्याच्या मालकीच्या कंपन्या

१. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन
२. अदानी ग्रीन एनर्जी
३. अदानी पॉवर
४. अदानी एनर्जी सोल्युशन
५. अदानी टोटल गॅस
६. अदानी विल्मर
७. अंबुजा सिमेंट
८. एसीसी
९. एनडीटीव्ही
१०. सांघी इंडस्ट्रीज