मुंबई : देशाचा परकीय चलनसाठा १० ऑक्टोबर रोजी सरलेल्या आठवड्यात २.१७ अब्ज डॉलरने घसरून ६९७.७८ अब्ज डॉलरवर स्थिरावला, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आले. त्याआधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा ६९९.९६ अब्ज डॉलरवर होता. या आधी सप्टेंबर २०२४ अखेर परकीय चलन साठा ७०४.८८ अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर होता. १० ऑक्टोबर रोजी सरलेल्या आठवड्यात काळात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३.५९ अब्ज डॉलरने वाढून १०२.३६५ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप केल्याचा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अंदाजे ५ अब्ज डॉलरची खर्ची घातल्याचा अंदाज आहे. चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर सर्वाधिक परकीय गंगाजळी असणारा भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप केल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मध्यवर्ती बँकेने बुधवारी रुपयाला आधार देण्यासाठी ३ ते ५ अब्ज डॉलर स्पॉट आणि नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड मार्केटमध्ये विक्री केल्याचा अंदाज आहे.खासगी, सरकारी आणि परदेशी बँकांमधील सात व्यापाऱ्यांच्या मते, रिझर्व्ह बँकेने अंदाजे ५ अब्ज डॉलरची खर्ची घातले आहेत. नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड बाजारात लक्षणीय उलाढाल सुरू असल्याचे दिसून आले.

रिझर्व्ह बँकेकडून अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, तथापि तिच्या या संभाव्य हस्तक्षेपांमुळे बुधवारी रुपया विक्रमी नीचांकातून डोके वर काढून, चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारीही रुपयातील तेजी कायम राहिली आणि भारतीय चलन प्रत्येक अमेरिकी डॉलरमागे ८७.७० च्या उच्चांकावर पोहोचले.मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेप करण्यापूर्वी, रुपयाने ८८.८१ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर मंगळवारी लोळण घेतली होती. मात्र बुधवारी ७३ पैसे, तर गुरुवारच्या सत्रात रुपया २१ पैशांनी वधारून ८७.८७ या पातळीवर स्थिरावला आहे. म्हणजेच दोन दिवसांत त्याचे डॉलरच्या बदल्यात विनिमय मूल्य ९४ पैशांनी सुधारले आहे.इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी चलनाची मंदी आणि गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची भावना यामुळे रुपयाला बळ मिळाले आहे.