मुंबई : जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने अनपेक्षितपणे अमेरिकेचे सार्वभौम पतमानांकन ‘एएए’वरून ‘एएप्लस’ पर्यंत खाली आणल्याने जगभरातील भांडवली बाजारांवर नकारात्मक पडसाद उमटले. देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बुधवारच्या सत्रात १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली तर दिवसभरातील सत्रात सेन्सेक्समधील घसरण एक हजार अंशांपर्यंत विस्तारली होती.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६७६.५३ अंशांनी (१.०२ टक्के) घसरून ६५,७८२.७८ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २०७ अंश (१.०५ टक्के) गमावले आणि तो १९,५२६.५५ पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा >>> गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा-सेबी फंडातून पैसे देण्यास सुरुवात, अशी मिळवा तुमच्या हक्काची रक्कम?
जागतिक बाजारातील प्रतिकूलतेपायी देशांतर्गत भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. युरोझोन आणि चीनमधील कमकुवत निर्मिती क्षेत्राचा क्रियाकलाप आकडेवारीसह अमेरिकेतील सार्वभौम पतमानांकनाशीसंबंधित नकारात्मक वृत्तामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. याव्यतिरिक्त, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा, अमेरिकी रोखे उत्पन्नावरील परतावा दरात झालेली वाढ या कारणांमुळे देशांतर्गत बाजाराचा मूडपालट झाला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.४६ लाख कोटींची घसरण
बुधवारच्या सत्रात झालेल्या पडझडीमुळे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.४६ लाख कोटींची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३,४६,९४७.५४ कोटी रुपयांनी घसरून ३०३.३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरलेल्या जुलै महिन्यात सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने सुमारे ३०७ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.
हेही वाचा >>> १०० रुपये घेऊन मुंबईत आले अन् आज शाहरुख खानचे शेजारी झाले, ही स्टार नव्हे तर सामान्य माणसाची आहे कहाणी
कोणाला किती नुकसान? सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात सुमारे १८,५३९ कोटी रुपयांची घसरण झाली, त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक १५,३५४ कोटी रुपये, टाटा मोटर्स ७,६७५.१० कोटी, बजाज फिनसर्व्ह ७,२२३.४१ कोटी आणि टाटा स्टीलला १,२५८ कोटी रुपयांची होरपळ सोसावी लागली. याउलट बाजारात पडझडीत केवळ नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रचे समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार व्यवहार करत होते.