Success Story of Kalpana Saroj: मोठी स्वप्ने पाहिल्यावर ती प्रत्यक्षात आणण्याचे धाडस मिळते असे म्हणतात. जर आपण आपल्या जीवनात कोणतेही ध्येय ठेवले तर आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, परंतु ही आव्हाने आपल्याला आणखी मजबूत बनवतात. याचे सर्वात परिपूर्ण उदाहरण म्हणजे कल्पना सरोज, ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही यश संपादन केले आणि आता त्यांची गणना देशातील सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांमध्ये केली जाते. चला तर मग जाणून घेऊया कल्पना सरोज यांच्याबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्पना सरोज कोण आहेत?

कल्पना सरोज एक उद्योजिका, TEDx स्पीकर आणि कमानी ट्यूब्सच्या चेअरपर्सन आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, कल्पना यांची ही कंपनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. मात्र, कोट्यवधी रुपयांची कंपनी चालवणाऱ्या कल्पना यांना एकेकाळी दोन रुपयांसाठीही संघर्ष करावा लागला होता.

हेही वाचा… एकेकाळी मित्रांकडून घेतली होती लाखोंची उधारी, आता उभारलीय १००० कोटींहून अधिकची कंपनी, वाचा नेमका कोणता व्यवसाय करते ‘ही’ व्यक्ती

संघर्षांनी भरलेले जीवन

कल्पना यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते, त्या दलित कुटुंबातून आल्या आहेत आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांचा त्रास इथेच थांबला नाही तर त्यांना घरगुती हिंसाचार आणि गरिबीचाही सामना करावा लागला. इतकंच नाही तर एका वेळच्या जेवणाचीही त्यांना अडचण होती. इतकी वाईट परिस्थिती असतानाही कल्पना यांनी स्वत:चा मार्ग तयार केला आणि यश संपादन केले. कल्पना यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

घरगुती हिंसाचाराचा सामना केला

लहान वयात लग्न झाल्यामुळे कल्पना यांना शाळा सोडावी लागली. एका पोलिस हवालदाराची मुलगी असलेल्या कल्पना यांनी त्यांची बरीच वर्षे पतीच्या कुटुंबासोबत मुंबईच्या झोपडपट्टीत राहून घालवली. इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या काळात त्यांना मानसिक आणि शारीरिक हिंसाचाराचाही सामना करावा लागला. कल्पना यांच्या वडिलांनी त्यांना यातून बाहेर काढलं, पण यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला.

हेही वाचा… ७ दिवसात ३४० कोटींची कमाई! बारावी नापास झालेली ‘ही’ व्यक्ती नेमका कोणत्या प्रकारचा व्यवसाय करते? जाणून घ्या

मात्र, नंतर कल्पना यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पुन्हा सुरुवात केली आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी काम करायला सुरुवात केली. त्यांनी एका सरकारी कापड गिरणीत दोन रुपये पगारावर काम केलं होतं. त्यानंतर टेलरिंगपासून त्यांना महिन्याला ५० रुपये मिळू लागले.

स्वतःचा व्यवसाय सुरू केला

अनेक महिने होजियरीच्या दुकानात काम केल्यानंतर कल्पना यांनी १९९० च्या दशकात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी केएस फिल्म प्रॉडक्शन नावाची कंपनी सुरू केली, जी तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी चित्रपट बनवते. यानंतर त्यांनी आपल्या मजबूत नेटवर्कच्या जोरावर रिअल इस्टेट क्षेत्रातही प्रवेश केला. यातून त्यांना स्प्रिंग ट्यूब्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. बोर्ड मेंबर म्हणून सुरुवात करून, त्यांनी कंपनी पुन्हा सुरू केली आणि मोठ्या तोट्यातून यशस्वी व्यवसायात बदल केला. आज कल्पना सरोज १०० कोटींहून अधिक किमतीचा व्यवसाय चालवतात.

एकूण मालमत्ता किती आहे?

कल्पना सरोज या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), बेंगळुरूच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या सदस्या आहेत. India.com वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती ९५० कोटी रुपये आहे. त्यांना ‘ओरिजिनल स्लमडॉग मिलेनियर’ असंही म्हटलं जातं. कल्पना सरोज यांना २०१३ मध्ये व्यापार आणि उद्योगासाठी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business dvr