छाया दातार
छत्तीसगडमधील दल्ली राजहरा येथील खाण कामगारांबरोबर सुरू झालेले इलिना यांचे काम पुढे पुस्तक रूपाने सर्वच क्षेत्रांतील कामगार स्त्रियांच्या चळवळींना, संघर्षाला पुढे नेणारे ठरले. ‘अ स्पेस विदिन द स्ट्रगल.’, ‘सुखवसिन : विस्थापित झालेल्या छत्तीसगडी स्त्रिया’ आदी पुस्तकांतून त्यांनी स्त्री कामगारांचा संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्या इलिना सेन यांच्याविषयी…
‘‘आपण एक एक पाऊल पुढे जात आहोत
सूर्यकिरण दिसायला लागले आहेत
सगळी स्वयंपाकघरे बंद पडली आहेत
सगळ्या कापडगिरण्यांच्या आतील
राखाडी तुळ्यांवर
सूर्यकिरण पडले आहेत
आणि बाहेर आपण उजेडाने उजळून
निघालो आहोत
लोक ऐकत आहेत आपली गाणी
भाकरी आणि गुलाब, गुलाब आणि भाकरी आम्हाला दोन्ही हवे आहेत.’’
८ मार्च, १९०९ मध्ये न्यूयॉर्कमधील कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार स्त्रिया प्रथमच आपल्या मागण्या घेऊन पुढे आल्या. १९१०मध्ये ‘आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदे’त हा दिवस विशेष ‘महिला कामगार दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला. पुढे १९१७ मध्ये हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून जाहीर झाला आणि १९७५ मध्ये जागतिक पातळीवर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. वरील गाणं हे न्यूयॉर्कमध्ये कापड गिरण्या बंद करून बाहेर पडलेल्या कामगार स्त्रियांनी म्हटलेलं आहे. ते जगभर लोकप्रिय झालं.
इलिना सेन हे गाणं खूप छान म्हणत असे. तिचं आवडतं गाणं होतं ते. आणि ते स्वाभाविकही होतं, कारण ती छत्तीसगडमधील दल्ली राजहरा येथील खाण कामगारांच्या संघटनेबरोबर, कामगारांसाठी काम करत होती. खाणींमध्ये पुरुष आणि स्त्री अशी जोडी लागत असे. शंकर गुहा नियोगी यांनी खाण कामगारांची संघटना बांधली होती. तेथे इलिनाचा नवरा डॉ. बिनायक सेन काम करत होते. म्हणून दिल्लीहून पीएच.डी. करून इलिना त्याच्याबरोबर छत्तीसगड येथे आली. तेथेच ती स्त्री कामगारांबरोबर संघटनेचं काम करायला शिकली. कामगार स्त्रियांविषयीचा ध्यासच तिला तिचं पहिलं पुस्तक तयार करण्यासाठी मार्गदर्शक ठरला. पुस्तकाचं नाव आहे, ‘अ स्पेस विदिन द स्ट्रगल.’ ते प्रसिद्ध झालं १९९०मध्ये. त्यांनी अनेक संघटनांना आवाहन करून ज्या संघटना स्त्री कामगारांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करत होत्या, किंवा त्यांच्यामध्ये नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्याकडून लेख मागवले. त्यामध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रिया, शेतमजूर स्त्रिया, मच्छीमार स्त्रिया, पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या आदिवासी स्त्रिया, अशा अनेक कामगार स्त्रियांचे प्रश्न उजळून निघाले. पुन्हा आजारी पडण्यापूर्वी २०११च्या आधी नव्याने सुरू झालेल्या संघटनांवरसुद्धा लिहिण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र ते काम झालं नाही त्याआधीच तिला कर्करोगाने ग्रासलं आणि त्यातच वयाच्या ६९व्या वर्षी २०२० मध्ये तिचं निधन झालं.
या संघटनांच्या विश्लेषणातून दोन महत्त्वाचे मुद्दे सतत समोर येत राहतात. एका बाजूने पितृसत्ताक शोषण, सतत दबावाखाली राहणारी स्त्री, दुसरीकडे या श्रमिक स्त्रियांची जगण्यासाठी चाललेली धडपड, आणि जनअंदोलनातून नैसर्गिक संसाधने जपण्याचे त्यांचे प्रयत्न. स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या टप्प्यात साम्यवादी पक्षांकडून, किंबहुना त्यातील सैद्धांतिक लेखन करणाऱ्या स्त्रियांकडून पितृसत्ताक शोषणाबद्दल बोलणाऱ्या स्त्रीमुक्ती चळवळीतील स्त्रियांबद्दल आक्षेप घेतले जात होते की, त्या कामगार वर्गाची एकी तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. एवढंच नव्हे तर स्त्रीवाद्यांवर शहरी, स्वत:च्या अधिकारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या,अशीही टीका होत असे. मात्र कित्येक शिकलेल्या शहरी कार्यकर्त्या कामगार स्त्रियांच्या प्रश्नांवर लढण्यास तयार असत. एवढंच नव्हे तर कामगार स्त्रियांमध्ये स्त्रीवादाचे बीज असते, स्वत:च्या हक्कांचे भान असते,असं त्या म्हणत. केवळ मालकाच्या विरोधात नाही तर घरातील पुरुषांच्याही हुकू मशाही विरोधात ते रुजत आहे हे या कार्यकर्त्या दाखवून देत असत.
आजपर्यंत कामगार वर्ग हा भांडवलशाहीविरोधी लढ्यात व्हॅनगार्ड, आघाडीचा नेता मानला जाई, पण अनेकदा जनाअंदोलनांमधील स्त्रिया, धरणे धरून बसलेल्या स्त्रिया, घेराव घालणाऱ्या स्त्रिया, केवळ घोषणा देण्यासाठी असतात असं मानलं जाई. म्हणूनच इलिनाने जाणीवपूर्वक हा कामगार स्त्रियांच्या लढ्याबद्दल तपशील देणारा संग्रह काढला होता. त्यात अनेकींचा समावेश होता. नंदिता गांधी यांनी महाराष्ट्रातील ‘महागाईविरोधी मंचा’मध्ये भाग घेतलेल्या स्त्रियांविषयी चाळीचाळींत जाऊन मुलाखती घेऊन त्या चळवळींची मांडणी केली आहे. मृणाल गोरे, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते, प्रेमा पुरव ही नावे सर्वांना माहिती आहेत, पण त्यांच्या बरोबरीने चळवळमय होऊन गेलेल्या स्त्रिया या लेखातून उजेडात आल्या. ‘चिपको चळवळ’ तर आता राजमान्य झाली आहे. ‘पर्यावरण चळवळी’ची सुरुवात केल्याचा मान ‘चिपको’ला आहे. त्याची सुरुवात केली ती स्त्रियांनी, केवळ त्यांच्या रोजच्या गरजेपोटी, त्यांच्या हक्काची झाडे कापण्यास कंत्राटदारांना परवानगी दिली म्हणून त्यांनी विरोध केला. रात्रंदिवस तेथे जागर धरला. विमला बहुगुणा, ज्यांनी स्वत: त्यात भाग घेतला. त्यांनी त्या दिवसांचं वर्णन केलं आहे. धुळे जिल्ह्यातील शाहादा, तळोदे, नंदुरबार येथे श्रमिक संघटनेने चालवलेल्या आदिवासी स्त्रियांच्या चळवळीचं, दारूबंदीच्या आग्रहाचं वर्णन निर्मला साठे यांनी केलं आहे. नलिनी नायक यांनी तिरुवनंतपुरम येथील कोळी स्त्रियांच्या कामाचं, बंदरावर बोटी आल्या की घासाघीस करून मासे विकत घेऊन बाजारात बसून दिवसभर विक्री करताना येणाऱ्या अडचणींविरुद्ध संघर्ष करण्याचा त्यांचा अनुभव अतिशय सुंदर पद्धतीनं वर्णन केला आहे. व्ही. गीथा या चेन्नईमधील कार्यकर्तीने बांधकाम स्त्री मजुरांची संघटना बांधण्याचा प्रयत्न झाला होता त्याचं वर्णन केलं आहे. निपाणी येथील तंबाखूच्या खळ्यांमध्ये विडीसाठी लागणाऱ्या तंबाखू कांडपाचे काम करणाऱ्या सुभाष जोशी यांनी बांधलेल्या संघटनेमधील स्त्रियांच्या नेतृत्वगुणांचे वर्णन छाया दातार यांनी केलं आहे. निपाणीमध्ये ५० हून जास्त खळ्यांमध्ये सुमारे ३००० स्त्रिया काम करत असत. त्यात काही देवदासीही होत्या. तेथील जाती-पाती पाळण्याच्या पद्धती व त्याविरुद्ध संघटनेने घेतलेली भूमिका याचंही वर्णन आलं आहे.
दल्ली राजहरा येथे कार्यरत असताना इलिनाला आदिवासी स्त्रियांचं जीवन जवळून पाहायला मिळालं होतं. तिने त्याच्यासाठी ‘रूपांतर’ संस्था सुरू करून स्त्रियांना विशेषत: तरुण मुलींना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला होता. विशेषत: छत्तीसगड हा मध्य प्रदेशमधून नुकताच नवीन प्रदेश निर्माण झाल्यामुळे तेथील राजकारण झंझावाती होतं. विकासाच्या नावाखाली जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या. अनेक तऱ्हेच्या हिंसेचे प्रकार वापरून आदिवासींना तुरुंगात डांबण्याचे, त्यांना तिथे खितपत ठेवण्याच्या तंत्राविरुद्धही त्यांनी आवाज उठवला होता. तिचं १९९५ मध्ये एक पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याचं नाव आहे, ‘सुखवसिन : विस्थापित झालेल्या छत्तीसगडी स्त्रिया’आणि तिचं शेवटचं पुस्तक आहे, ‘छत्तीसगडच्या अंतरंगात: राजकीय आठवणी’. या सर्वाला आणखी एक पार्श्वभूमी आहे. त्यांच्या डॉक्टर नवऱ्याने शहीद रुग्णालय सुरू केलं होतं आणि अगदी अल्प पैशांमध्ये आदिवासींना, गरिबांना तेथे आरोग्य सेवा मिळत असे. तो तेथील ‘पी.यू.सी.एल.’ (Peoplel s union of Civil Liberties) या मानव अधिकार जपणाऱ्या संघटनेचाही कार्यकर्ता होता. त्याने त्यावेळी सरकारने सुरू केलेल्या एका नव्या प्रयोगाबद्दल, नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईबद्दल, संशोधन करून एक अहवाल तयार केला आणि तो प्रसिद्ध केल्यावरून त्याला तुरुंगामध्ये डांबण्यात आले. बिनायक सेनचे हे प्रकरण २००७ पासून २०११ पर्यंत सुरू होते. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्याला जामिनावर सोडवण्यासाठी इलिनाने खूप मेहनत घेतली.
हे प्रकरण सुरू असतानाच इलिनाला नागपूर येथे नव्याने उघडल्या गेलेल्या हिंदी विद्यापीठामध्ये ‘स्त्री अभ्यास केंद्र’ उघडण्याची संधी मिळाली. आजपर्यंत एम.ए.च्या पातळीवर हिंदीतून स्त्री अभ्यास शिकविण्याचा अभ्यासक्रम कोठेही सुरू झाला नव्हता. त्यामुळे अगदी नव्याने सुरुवात करायला लागली. पुस्तके जमवणं, काही वेळा हिंदीमध्ये अनुवाद करणं, करवून घेणं. याच सुमारास इलिनाने ‘इंडियन असोसिएशन फॉर वुमेन्स स्टडीज’ची त्रैवार्षिक परिषद भरवण्यात पुढाकार घेतला होता. ती त्यावर्षी सचिव होती.
वर्ध्याच्या शेजारील टेकाडावर हे विद्यापीठ वसलेलं आहे. नागपूर परिसरातील बऱ्याच मुली तेथे शिकण्यास येत होत्या. वर्ध्याहून पवनार जवळ होते आणि विनोबा भावे त्या आश्रमामध्ये असल्यापासून अनेक स्त्रिया गांधींजीच्या शिकवणीचा अभ्यास करायला तेथे येत असत. इलिनाला हाही फायदा मिळाला. मीही माझ्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या स्त्री अभ्यास शिकणाऱ्या मुलींना पवनार येथे घेऊन गेले होते.
दिल्लीला शिकणारी इलिना वर्गभेदापलीकडे जाऊन कामगार पुरुष आणि स्त्रियांबरोबर काम करण्याचे, वेळ प्रसंगी त्यांच्याबरोबर राहण्याचे श्रेय आपल्या नवऱ्याला देते. ती म्हणत असे की, एकीकडे बुद्धिवादी वचनबद्धता, शिक्षणविषयक काम करण्याची आवड आणि दुसरीकडे भावनिक आणि व्यावहारिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची उत्कटता या दोन्हीचा संगम मी साधू शकले ते बिनायकमुळे.’
होशंगाबादला (आताचं नर्मदापूरम) राहात असताना तिच्यात लोकसंगीताची आवड निर्माण झाली. नर्मदेच्या घाटावर सल्कनपूर आणि सांदिया येथील मेळ्यांमध्ये तिला छत्तीसगडचे लोकसंगीत ऐकायला मिळालं. त्यात इतकी विविधता होती की ती भारावून गेली. तिच्या पीएच.डी.च्या विषयामध्ये, तिने ‘स्त्रियांचे काम’ या विषयावर लिहिताना त्यांच्या संगीतावरही लिहिले आहे. यामध्ये आध्यात्मिक संगीत, संघर्षाचे संगीत, पोवाड्याचे संगीत, असे बरेच प्रकार होते.
तिच्या जीवनात तिची पहिली मुलगी प्राणहिता ही ते दोघे दल्लीला आल्यावर आली. पुण्याहून तिने तिला दत्तक घेतलं होतं. ज्या कामगारांबरोबर ती काम करत होती त्यांनी तिचं खूप प्रेमानं स्वागत केलं. ती पाठीवर बांधलेल्या घट्ट पट्टे असलेल्या पिशवीमध्ये छान बसायची. इलिना तिला घेऊन सायकलवरून कामावर जात असे. प्राणहितानंतर काही वर्षांत इलिना व बिनायकने अपराजिताला दत्तक घेतलं. इलिना मुलींचे कौतुक करताना सांगते, की त्यांच्यामुळे तिला जीवनात खूप आनंद मिळाला. २०१० नंतर इलिना मुंबईला आली. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’मधील ‘स्त्री अभ्यास केंद्रा’मध्ये तिला प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि काही काळ ती स्थिरावली. पण अचानक तिला कर्करोगाची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे ती कोलकाता येथे परतली, शेवटचा श्वास घेण्यासाठी. श्वास थांबला असला तरी तिने कामगार स्त्रियांसाठी केलेलं काम आजही वातावरणात टिकून आहे.