उषा मेहता
प्रमिला दंडवते आणि मधु दंडवते या दाम्पत्याने आपलं संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनाच्या लढाईत झोकून दिलं होतं. प्रमिला या मधु दंडवते यांच्या केवळ सहचारिणी या मर्यादित भूमिकेत अडकलेल्या नाहीत तर त्यांनीही समाजवादी चळवळीत हिरिरीने भाग घेतला होता. खासदार म्हणून त्यांनी स्त्रियांच्या विविध समस्यांवर सातत्याने आवाज उठवला होता. हुंडाबळी, बलात्कार या स्त्रियांवरच्या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर आणि माध्यमांद्वारे सजगपणे प्रयत्न केले. याशिवाय चित्रकला आणि नृत्यकला यांचा अभ्यास करून चळवळीची सांस्कृतिक बाजूही विकसित करण्यावर त्यांचा भर होता. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांकडे जातीने लक्ष घातलं होतं आणि त्यांचा पाठिंबा मिळवला होता.
‘समाजवादी महिला समिती’, ‘सुनंदा सहकार’ आणि ‘महिला दक्षता समिती’ या तिन्ही संस्था सुरू करून त्यांनी स्त्री चळवळीला एक निर्णायक वळण देण्याचा प्रयत्न केला. ‘महागाईविरोधी संयुक्त महिला समिती’ लोकसभा आणि विधानसभा या व्यासपीठांवर स्त्रियांसाठी आरक्षण, तसंच देशपातळीवर एका ‘महिला आयोगा’ची स्थापना करण्यासाठी केलेले भगीरथ प्रयत्न या प्रमिला दंडवते यांच्या चौफेर कार्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत.
प्रमिला या पूर्वश्रमीच्या प्रमिला जनार्दन करंडे. पहिल्यापासून त्या मुंबई शहरात वाढलेल्या. त्यांचा ओढा लहानपणापासूनच समाजकार्याकडे होता. आपल्या घरी काम करणाऱ्या गड्याला साक्षर करण्यासाठी त्या त्याची शिकवणी घेत, आईवडिलांच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वयंस्फूर्तीने. त्या वयातच त्या एका समितीच्या शाखेत जाऊ लागल्या. तिथल्या खेळांमध्ये त्या रमत. परंतु आजूबाजूच्या प्रश्नांबद्दल त्यांना जे प्रश्न पडत त्याची उत्तरे त्यांना शाखाप्रमुख बाईंकडून मिळत नसत. १९४२ची ‘चले जाव चळवळ’ त्या वेळेला जोरात होती. स्वराज्य प्राप्तीसाठी निकराचा लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी गवालिया टँक मैदानातून ‘भारत छोडो’चा नारा दिला होता. त्यातून प्रेरणा घेत हजारो लोक जीवाची बाजी लावून लढत होते. प्रमिलाताईंची मैत्रीण कुसुम महाले हिच्याकडून त्यांना या भोवताली चाललेल्या आंदोलनाची माहिती मिळत असे. आपल्या प्रश्नांना राष्ट्र सेवा दलात उत्तरं मिळू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी राष्ट्र सेवा दलात जायचा निर्णय घेतला. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, महात्मा गांधींचे कार्य अशा अनेक विषयांवर सेवा दलात बौद्धिके होत असल्यामुळे सेवादल शाखे
नृत्य आणि चित्रकला या दोन्ही विद्यांमध्ये पारंगत असल्यामुळे प्रमिला करंडेवर ‘सेवा दल’ कला पथकाची अधिकाधिक जबाबदारी पडू लागली. समूह गीतं, समूह नृत्यं, ‘उत्क्रांती’ ही नृत्यनाटिका असे प्रयोग प्रमिलाताईंच्या मार्गदर्शनातून बसवण्यात आले. ‘लोकरंजनातून लोकशिक्षण’ हे कलापथकाचं ब्रीद होतं. पण काही काळानंतर सामाजिक आणि राजकीय कार्याकडे पूर्णपणे वळावं असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी एस.एम.जोशींची अनुमती मागितली आणि त्यांच्या होकारानंतर त्या ‘समाजवादी पक्षा’च्या संघटनात्मक कार्याकडे वळल्या. स्त्रियांना दैनंदिन जीवन आणि राजकारण समजावून देणं, हळदी-कुंकवासारखे विधवांना वगळणारे समारंभ टाळून त्याऐवजी तिळगूळ समारंभ आयोजित करणं, स्त्रियांना बोलतं करणं वगैरे त्यांनी योजलेल्या मार्गांमधून त्यांचं संघटन कौशल्य दिसून येत असे.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सामान्य माणसांच्या प्रश्नांविषयीची त्यांची पोटतिडीक प्रकर्षानं जाणवत असे. दादरच्या ‘राणू घाटी चाळी’च्या परिसरात झोपडपट्ट्या व कामगारांची वस्ती होती. त्या वस्तीत प्रमिलाताईंच्या ‘समाजवादी महिला सभे’ने पाळणाघर व बालवाडी सुरू केली. त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होत असत, पुरस्कार मिळत असत. ते सर्व पैसे एकत्र करून त्यांनी ‘स्त्री विमोचन ट्रस्ट’ बनवला. त्यातून स्त्रिया व बालकल्याणासाठी खर्च होऊ लागला. मुसलमान स्त्रियांसाठी शाळा काढण्याचा प्रयत्न करण्यातही हा ट्रस्ट आघाडीवर होता. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’, ‘गोवा मुक्ती आंदोलन’ यांत त्या सहभागी झाल्या. त्यातून पोलीस चौकी, लाठीमार आणि तुरुंगवास त्यांच्या अंगवळणी पडला.
‘चले जाव’आंदोलनातील, स्वातंत्र्यसैनिक असलेल्या काही स्त्रिया, समाजवादी विचारांशी निगडित असलेल्या काही संस्था, संघटनांमधून काम करीत होत्या. त्यांना समाजवादी विचारांची बैठक असणारी स्त्री संघटना असावी असं वाटत होतं. त्याच वेळी एसटी कामगार संपावर जाणार होते. तो दीर्घ काळ लांबण्याचीही शक्यता होती म्हणून कामगारांच्या बायकांचाही त्यात समावेश करण्याची विनंती कामगारांनी अनुताई लिमये यांना केली. अनुताईंनी ती सर्व जबाबदारी प्रमिलाताईंवर टाकली आणि समविचारी स्त्रियांचं सहकार्य घेऊन ‘समाजवादी महिला सभा’ ही संस्था प्रमिलाताईंच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आकार घेऊ लागली.
स्त्रियांच्या एका शिबिरात, जगातील आणि भारतातील स्वातंत्र्य आंदोलने, स्वतंत्र भारताची घडण कशी होत आहे, त्यात अपेक्षित बदल कोणते, स्त्रियांचा सामाजिक आणि राजकीय दर्जा, स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संकल्पनेचा अर्थ इत्यादी मुद्दे बौद्धिकांमधून समजावून देण्यात आले आणि ‘समाजवादी महिला सभे’(स.म.स.)ची विधिवत स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या दिवसापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत ‘स.म.स.’च्या विकासाकरिता प्रमिलाताईंनी प्रचंड परिश्रम घेतले. मुंबईत ‘स.म.स.’च्या चार शाखा सुरू झाल्या, इतर शहरांतूनही शाखा सुरू झाल्या. अनसूया लिमये, विजया चौक, कमल पाध्ये आणि इतर समविचारी स्त्रियांची त्यासाठी त्यांना साथ लाभली. १९६०च्या दशकात धुळे आणि खानदेशाच्या सर्व भागांत विजया चौक यांनी ‘स.म.स.’च्या शाखा सुरू केल्या. कारण त्या भागात बायकांना जाळून टाकण्याचं प्रमाण जास्त होतं, इतरही प्रश्न होतेच. ‘समाजवादी पक्षा’ची दुय्यम संघटना म्हणून नव्हे, तर एक स्वायत्त संघटना म्हणून कार्यरत राहण्याचा या स्त्रियांचा दृढ निर्धार होता. बालविवाह आणि हुंडा यांना विरोध, मुलींना वारसा हक्कापासून वंचित ठेवणं अशा बाबतीत प्रमिला
याच काळात सांगलीच्या एका ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवा सुनेचं केशवपन करण्याचा घाट घातल्याची बातमी कानावर आली होती. ‘स.म.स.’तर्फे पुणे, सातारा, कोल्हापूर आणि आणखी काही गावांतून एकत्रित मोर्चे आले आणि त्यांनी केशवपनाचा डाव उधळून टाकला. त्यानंतर महाराष्ट्रात विधवा झालेल्या सुनेचं केशवपन करण्याचं धाडस कोणीही केलं नाही.
प्रमिलाताई १९८०मध्ये मुंबईतून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांनी लोकसभेत एकामागोमाग एक अशी स्त्री अत्याचारविरोधी प्रकरणं ऐरणीवर आणली. उदा. उत्तर प्रदेशात माया त्यागी या स्त्रीवर अत्याचार झाला ते प्रकरण. त्यानंतर मथुरा या स्त्रीवर पोलीस कोठडीत अत्याचार झाला आणि तोही पोलिसांकडून. पोलिसांनी ती सेक्स वर्कर (लैंगिक कामगार) असल्याचं सांगून आपल्या कृत्याचं समर्थन केलं. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर शरीरसंबंध लादणं हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल दोषी पुरुषाला शासन झालंच पाहिजे, असा आग्रह धरून त्यानुसार आंदोलन करण्यात प्रमिला दंडवतेही अग्रभागी होत्या.
दिल्लीमध्ये राहून त्यांनी सुमन कृष्णकांत, मंजुमोहन आणि इतर समविचारी स्त्रियांबरोबर ‘महिला दक्षता समिती’ सुरू केली. हुंडाबळी, भाववाढ आणि एकंदरीतच स्त्री अत्याचार विरोधी कार्यात त्या कार्यरत राहिल्या. ‘महिला दक्षता समिती’ची शाखा त्यांनी मुंबईत कशी सुरू केली तीही गोष्ट सांगण्यासारखी आहे. सुधा वर्दे सांगतात, ‘महिला दक्षता समिती’ तुमच्या घरात सुरू करायची आहे असं म्हणत, एक दिवस कुमुद करकरे माझ्या घरी आली. ‘‘अगं पण कोणी ठरवलं हे?’’ असं मी विचारल्यावर कुमुद म्हणाली, ‘प्रमिलानं सांगितलं.’ प्रमिला खासदार होती म्हणून नाही, पण प्रमिलेला आणि कुमुदला ‘नाही’ म्हणू शकत नसल्यामुळे ‘महिला दक्षता समिती’ आमच्या घरातच सुरू झाली. उषा साठेमुळे रजिस्ट्रेशन वगैरे झालं. हा होता त्या काळातला आमचा एकमेकींवरचा विश्वास.’’
त्या लोकसभेत निवडून गेल्यावर, लगेचच गेल्या सहा महिन्यांत दलित स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांबाबत किती गुन्हे नोंदवले गेले हा त्यांचा प्रश्न सभागृहात आला. त्यापाठोपाठ स्त्रियांना विविध क्षेत्रांत प्रगती करून घेता यावी यासाठी सरकारने कोणत्या योजना पुरस्कृत केल्या आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात १४ आदिवासी तरुणींवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यावर प्रमिला दंडवते यांनी लोकसभेत चर्चा घडवून आणली आणि केंद्र सरकारला कारवाई करण्यास भाग पाडलं. राजस्थानात रूपकुंवर या स्त्रीचा नवरा निधन पावल्यावर तिच्यावर सती जाण्याची सक्ती करण्यात आली होती. त्या वेळी प्रमिलाताईंनी सडेतोड भूमिका घेऊन धैर्यानं निषेधात्मक पवित्रा घेतला. सतीचा वार्षिकोत्सव साजरा करण्यासाठी मिरवणूक निघणार होती. त्याविरोधातही सतर्क राहून त्यांनी लोकसभेत आवाज उठवला. हुंडा, बलात्कार वगैरे गुन्ह्यांबाबत ‘क्रिमिनल प्रोसीजर कोड’मध्ये सुधारणा सुचवणारी विधेयकं त्यांनी लोकसभेत मांडली. शहाबानो या तलाकपीडित स्त्रीच्या बाजूने त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. विधानसभेत आणि लोकसभ
प्रमिलाताईंच्या धडाडीचं आणखी एक उदाहरण. स्थळ : मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडियम, घटना १९७२ मधली. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची कर्तबगारी दाखवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या, पण आर्थिक आघाडीवर मात्र त्या अपयशी ठरत होत्या. महागाई, गरिबी, टंचाई आणि बेकारीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळू शकेल असं त्यांच्या हातून काहीच ठोस घडत नव्हतं. इंदिरा गांधी तारस्वरात आपलं भाषण करत असताना जमलेल्या जमावातून एक आरोळी आली, ‘‘हमें भाषण नहीं चाहिये, राशन चाहिये.’’ ही आरोळी बुलंद आवाजात उत्स्फूर्तपणे ठोकणारी धैर्यशील स्त्री म्हणजे प्रमिला दंडवते. ती आरोळी श्रोत्यांनी उचलून धरली आणि तिची जणू घोषणाच बनली. पंतप्रधानांनी भाषण आवरतं घेतलं आणि त्या सभास्थान सोडून निघून गेल्या.
एकूणच. प्रमिला दंडवते त्यांनी स्त्रियांसाठी आणि समाजासाठी केलेली अथक तपस्या, मेहनत आणि त्यांचं एकूण योगदान चिरकाल स्मरणात राहील.
-उषा मेहता
ushasmehta@gmail.com