डॉ. स्वाती गाडगीळ
दिवाळी जवळ येते आहे. सगळ्यांच्या घरी स्वच्छतेची घाई सुरू होईल. पण ही स्वच्छता कायम का ठेवली जात नाही? घराबरोबरच परिसराची, देशाची आणि पुढे जाऊन जागतिक स्वच्छताही आपल्या हातात असू शकते. आपल्या देशात आणि परदेशांतही स्वच्छता मोहीम आखून परिसर स्वच्छतेचे धडे गिरवणाऱ्या डॉ. स्वाती गाडगीळ यांचा खास लेख.

गेली काही वर्षे पाऊस पूर्वीसारखा संयमी राहिलेला नाही, अधिकाधिक रौद्र रूप धारण करून आपली पाचावर धारण बसवतो आहे. प्रत्येक राज्यात तो उधाण नाचून जातो, कुठे उग्र तांडव तर कुठे बेभान होऊन सगळं काही धुवून नेतो, आणि अशातच समाजमाध्यमांच्या भाषेत ‘मुंबईची तुंबई’ होते! एकीकडे नालेसफाईवर तोंडसुख घेतले जाते तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांचा वाढता हव्यास आणि बेलगाम वृक्षतोड, या प्रलय सदृश परिस्थितीस कारणीभूत आहेत असा दावा केला जातो. या सगळ्यात निसर्गसुद्धा बिचाऱ्या सामान्य माणसालाच वेठीस धरतो अशी भावना मनामनात रुजू लागते. पण मला नेहमीच पडणारा एक प्रश्न हा की ‘बिचारा सामान्य माणूस’ कसा वागतो याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर का बरे ‘व्हायरल’ केले जाऊ नयेत? त्याची लाज वाटून तरी लोकांचे वर्तन सुधारेल का?

‘राइट टू प्रायव्हसी’च्या नावाखाली परवानगीशिवाय कोणी कोणाचे फोटो आणि व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर टाकू शकत नाही हे जरी खरे असले तरी मुंबईच्या रस्त्यांवर रोज कचरा टाकणारे, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या राजरोसपणे तयार करणारे कारखानदार, त्या सर्रास देणारे दुकानदार आणि बेजबाबदारपणे त्या वापरणारे नागरिक, यांना जाब कोण विचारणार? पावसाळ्यात डेंगीसारख्या जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. पण वर्षभर पान, तंबाखू, गुटखा खाऊन इतस्तत: थुंकणारे आणि सार्वजनिक ठिकाणी निर्लज्जपणे कचरा टाकणाऱ्यांचे फोटो नावासहित का देऊ नये, असा साहसी सवाल माझ्या मनात वेळोवेळी येतो. पण प्रश्न तोच आहे ना, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या लोकशाहीत जिथे बहुतांशी व्यवस्था कोलमडत चालल्या आहेत तिथे भारतीय राज्यघटनेतील भारतीय ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ दर्शविणाऱ्या कलम ‘५१ अ’ची पायमल्ली झाली तरी विचारणार कोण? कोणी थुंकणाऱ्या किंवा कचरा टाकणाऱ्या व्यक्तीस थांबून विचारायचे धाडस केलेच तर आमच्या वाक्चातुर्य असणाऱ्या, पण नागरी भावना बोथट झालेल्या अनेक हजरजबाबी ‘बंधू भगिनी’ क्षणाचा विलंब न करता ‘पालिकेचे सफाई कर्मचारी काय करतात मग? त्यांना त्यांची कामे चोख करायला सांगा की! आमच्या प्रभागात कचऱ्याची गाडी रोज येत नाही, तिची वेळ नक्की नाही, आम्ही कचरा घरात का साठवून ठेवायचा?’, अशी हुज्जत घालण्यात धन्यता मानतात. वेफर्स, बिस्किटे खाऊन रिकामा प्लास्टिकचा पुडा अथवा वडापाव खाऊन तेलकट कागदाचा बोळा, रिकामी पाण्याची बाटली रस्त्यात अगर ट्रेनच्या खिडकीतून टाकणाऱ्या व्यक्तीस नम्रपणे त्याची चूक निदर्शनास आणून दिली तर ताबडतोब उलट प्रश्न येतो ‘कचऱ्याचे डबे आहेत का कुठे? दाखवा तरी!’ अरे पण जोपर्यंत वडापाव, समोसा, बर्गर, वेफर्स त्या पुड्यात असतात तोपर्यंत तो पुडा स्वत:च्या बॅगेत किंवा पर्समध्ये ठेवलेला चालतो आणि ज्या क्षणी यासाठी एक प्रयोग डोंबिवलीमध्ये करून पाहिला. अनेक ठिकाणी, लोकांनी येताजाता कचरा टाकल्याने अघोषित आणि ‘अदृश्य’ कचराकुंड्या तयार झाल्या होत्या तिथे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून स्वच्छता विभागाच्या मदतीने कचऱ्याचे ढीग उचलून न्यायला कर्मचारी बोलावले. पालिकेची गाडी व कर्मचारी, समविचारी मित्र परिवार आणि काही उदार दात्यांच्या मदतीने तिथे झाडं लावून, कुंड्या ठेवून तो परिसर सुशोभितसुद्धा केला. एक अनुभव मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. एके दिवशी डोंबिवली स्थानकावर ट्रेनची वाट बघत उभी होते. पंधरा ऑगस्टची सकाळ, साडेदहा अकराची वेळ होती ती! वातावरणात देशभक्तीचे वारे वाहात होते. अगदी रेल्वेच्या ध्वनिप्रक्षेपकावरूनसुद्धा देशभक्तीपर गीते सादर केली जात होती आणि तशातच हळूहळू पांढऱ्याशुभ्र साड्या नेसलेल्या, त्यावर छोटा तिरंगा लावलेल्या अनेक शिक्षिका फलाटावर जमू लागल्या होत्या. शाळेत वाटलेल्या गोळ्या, चॉकलेट पर्समधून काढून तोंडात टाकत गप्पा मारीत होत्या आणि तशातच एका तरुण शिक्षिकेने पुढे येत लांब हात करून चॉकलेटचा कागद रुळावर फेकला. मी चकित. शिक्षकसुद्धा असे वागू शकतात? मग चांगले नागरिक कसे तयार होतील? मी तिच्याजवळ जाऊन दोन्ही हात जोडून तिला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिने कागद रुळावर फेकलेला मी पाहिल्याचे सांगितले. ती ओशाळल्या नजरेने मला ‘सॉरी’ म्हणाली. ‘डोंबिवली विमेनस् वेलफेअर सोसायटी’या माझ्या संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील बावीस शाळांसाठी मोठे झाकण आणि चाके असलेले ४८ किलो क्षमतेचे कचऱ्यासाठीचे डबे मुंबईहून पाठवले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्थानिक शिक्षकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. लहानपणीच संस्कार होणं गरजेचं यासाठी.

प्रशांत महासागरात फ्रान्स देशाच्या जवळजवळ तिप्पट आकाराचा कचऱ्याचा द्वीप तयार झाला आहे ज्यात सर्वाधिक प्लास्टिक आहे. सगळ्या देशांमधून वाहून आलेला हा कचरा, हवाई द्वीप आणि कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यालगत तरंगत आहे. प्रत्येक दशकात या कचऱ्यात दसपटीने वाढ होत आहे. प्रत्येक देशातील नागरिकांची ही जबाबदारी आहे की आरोग्य आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही असे त्यांचे वर्तन असावे. म्हणूनच होईल तेवढे काम जगभरातील इतर देशांमध्येसुद्धा करावे या विचाराने आफ्रिकेतील एका व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना तेथील गोठ्यातील शेणाचा योग्य वापर कसा करता येईल, जसे खत, गोबरगॅस यासाठी भारतातून तज्ज्ञ मंडळींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. त्यांचे गोठे आणि आवार स्वच्छ राहण्यास मदत होईल असे तर त्यांना खचितच वाटले नव्हते.

मी माझा खारीचा वाटा म्हणून स्वच्छता प्रक्रियेत नेहमीच भाग घेते. वैद्याकीय व्यवसायात असल्याने दिवसाच्या शस्त्रक्रिया उरकून रुग्णालयातून बाहेर पडले की उरलेला वेळ परिसरात स्वच्छता कशी राखता येईल यासाठी घालवते. डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकात ‘रेल आहारा’मुळे होणारी लोकांनी केलेली अस्वच्छता, रेल्वे वरिष्ठांच्या मदतीने नियंत्रणात आणण्यात मदत केली तेव्हा खूप समाधान मिळाले. बदलापूर, शहापूर नजिकच्या पाड्यांवर वेळोवेळी जाऊन स्वच्छता करवली आणि त्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन पावसाळ्यात डोंबिवलीतील बहुतांश झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली, खासकरून डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केली. अनेक असे उपक्रम भारतात जिथे जिथे मी जाते तिथे करीत असते. हिमाचल प्रदेशातील रोहडू येथे प्रत्यक्ष जाऊन आणि काही वेळा व्हिडीओ कॉलवर स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. करोना काळात महाराष्ट्रातील १०० हून अधिक गावांमधील स्त्रियांना आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. इतकेच नाही तर तेथील स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले आणि योग्य विल्हेवाट कशी लावावी तेसुद्धा शिकवले.

भारतातील अनेक राज्यांमधील शाळांमध्ये आणि आफ्रिका, नेपाळ येथील काही शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. ४५० पेक्षा अधिक सत्र झाली आहेत.

सणासुदीला घरादाराची स्वच्छता करावी हा नेम असतो, पण कायमच स्वच्छता राखली तर एकदम काम अंगावर पडणार नाही ना! त्याचप्रमाणे दोन ऑक्टोबरला आणि अलीकडे गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेआधी शहरांची स्वच्छता करून डीडीटी पावडर फवारणे, रांगोळ्या काढणे ही प्रथा प्रचलित झाली आहे. पण वर्षातील प्रत्येक दिवस जर याबाबत जागृती असेल तर असे मोजक्याच दिवशी केरसुण्या घेऊन बाहेर पडावे लागणार नाही. तसेही बऱ्याच जणांसाठी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रपंच केवळ फोटो काढून टाकता यावे यासाठीच असतो बहुधा, कारण हा ‘इव्हेंट’ झाला की विजयी मुद्रेने तंबाखू मळत किंवा गुटख्याची पुडी तोंडात रिकामी करून रस्त्याच्या मधोमध कचरा टाकून जो तो आपापल्या घरी निघून जातो. आलिशान एसी दुकानातून बाहेर येऊन पदपथांवर पान गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणारे दुकानदार पाहिले की तळपायाची आग मस्तकात शिरते! अनेक दुकानदार दिवसभराचा दुकानातील कचरा रात्री रस्त्याच्या कडेला तसाच लोटून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत दुकानातील गडी केरवारे करून पादचाऱ्यांच्या अंगावर सगळी धूळ लोटत असतात! अशाच काही दुकानदारांना मी कचऱ्याचे डबे घेऊन दिले तेव्हा शरमेने मान खाली घालून ‘सॉरी’ म्हणाले. अहो. सणावारी रस्त्यांवर रांगोळ्या आणि फुलांची उधळण पण बाकीचे दिवस फक्त धुळीचे लोट, कचऱ्याचे ढीग! ट्रेन, बसच्या खिडकीतून तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींच्या बालकन्यांमधून, अंगावर कधी काय पडेल याची सतत भीती वाटत असते. उच्चभ्रू लोकांच्या टोलेजंग इमारतींच्या बालकन्यांमधूनसुद्धा कचरा पडल्याच्या घटना वारंवार होत राहतात. क्वचित सिगारेटची जळती थोटकं आणि कंडोमसुद्धा खिडकी बाहेर फेकणारे महाभाग असतात.

मी मात्र स्वत:साठी काही नियम आखून घेतले आहेत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची जबाबदारीही घेतली आहे. तोंडात पान गुटख्याचा तोबरा भरलेल्या चालकाची रिक्षा किंवा टॅक्सी घ्यायची वेळ आली तर त्याला प्रथम कुठे तरी बेसिन शोधून थुंकून ये सांगते. गाडी चालवताना एखादा रस्त्यात थुंकल्यास पुढे गाडी कडेला उभी करून, झालेली भाड्याची रक्कम देऊन त्याला मोकळे करते आणि दुसरे वाहन शोधते. पान तंबाखूचा तोबरा भरलेल्या भाजीवाल्यांकडून कितीही ताजी भाजी असली तरी मी घेत नाही कारण भाजीचा भाव विचारल्याबरोबर हातगाडी किंवा टोपल्याच्या बाजूलाच पचकन थुंकून मग ते भाव सांगतात मग माझी पावले आपसूकच दुसऱ्या भाजीवाल्याकडे वळतात. माझ्या संस्थेमार्फत ‘थुंकी मुक्त गाव अभियाना’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात आणि पुणे संभाजीनगर भागात जवळपास अठरा गावांमधे थुंकण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेसिन बसवून दिले आहेत. आपलं घर तेवढं आपलं, आणि पलीकडचा रस्ता, गाव, शहर, देश मात्र आपला नाही! घर झाडून एकदा का कचरा बाहेर लोटला की झाली आपली स्वच्छता असा अनेकांचा समज असतो. देशाचे चांगले नागरिक म्हणून केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दोन दिवशी काय ती देशभक्ती आणि तीसुद्धा भाषणे आणि देशभक्तीपर गीतांपुरतीच! शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो असे म्हणतात पण एका मोठ्या हुद्द्यावर असलेली आसामी चहाचा प्लास्टिक कप गाडीतून रस्त्याकडेला फेकताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. असे तर अनेक महागड्या गाड्यांच्या काचा खाली करून लोक थुंकताना आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिले असेलच.

विशेष गोष्ट अशी की हीच जनता परदेशात सुतासारखी सरळ असते. तिथे डॉलरमध्ये दंड भरावा लागतो किंवा पोलीस उचलून नेतील ही भीती वाटते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी प्लेगने मृत्यूचे तांडव घातले आणि अलीकडे २०२० मध्ये करोनाने जगभर थैमान घातले. अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यावरच काही काळ का होईना डोळे उघडतात. प्रत्येकाने दंडाशिवायच स्वत:ला चांगले वळण लावले तर आपला देश, जो समृद्ध आहेच तो अधिक सुंदर आणि स्वच्छ होईल, डोंगर, नद्या मोकळा श्वास घेतील, तीन दिशांना असलेला सागरकिनारा आनंदाची उधळण करेल. स्वच्छ आकाशातील टिमटिमणाऱ्या ताऱ्यांचे प्रतिबिंब समोर असलेल्या तळ्यात पाहात जेव्हा रात्र उमलेल तेव्हा आपला देश खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि संपन्न आहे, असे म्हणता येईल. सामर्थ्य आणि राष्ट्र प्रेम या दोन गुणांची जोड असलेल्या नागरिकांचा, देशास नक्कीच अभिमान वाटेल!

swats7767@gmail.com