डॉ. अर्चना ठोंबरे
पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी थोडं थांबावं, असं शरीर सांगत असताना मन मात्र उसळी घेऊन पुढचं पाऊल टाकत राहातं तेव्हा मानसिक क्षमतेचा कस लागत असतो. आम्हाला तो अनुभव आला आमच्या युनामच्या गिर्यारोहण मोहिमेत!

खरं तर सगळ्याच पर्यटकांना सूर्याच्या पहिल्या किरणांच्या सोन्यानं मढवलेली बर्फाच्छादित शिखरं, हिरव्यागार पर्वतांमधून खाली खोल दरीत स्वत:ला झोकून देणारे पांढरे शुभ्र धबधबे, खळाळत वाहणाऱ्या नद्या, चहूबाजूंनी पसरलेली पांढऱ्या-पिवळ्या-लाल रंगांची सुंदर फुलं आकर्षित करीत असतात. पण यापलीकडे आम्हा सगळ्यांना खुणावीत होता तो हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातला २० हजार ५० फूट उंच असलेला आव्हानात्मक, ऑक्सिजन कमी असलेला, अति थंड, खडकाळ, तीव्र चढण असलेला युनाम पर्वत! आमच्यासाठी हे होतं धाडसी पर्यटन. आम्ही ११ जणांनी नुकतीच (२९ जुलै ते १२ ऑगस्ट) युनाम गिर्यारोहण मोहीम पार पाडली.

आमच्यातील एक जण ६३ वर्षांची, तिघी ४५च्या आणि बाकी ५०ते ६० दरम्यानचे! त्यामुळे तर ही मोहीम जरा जिकरीची. सह्याद्रीमध्ये हायकिंग आणि हिमालयातील काही ट्रेक असा अनुभव असलेले, समुद्रासपटीपासून २००० फुटांवर राहणारे आम्ही आता युनामच्या २० हजार फूट उंचीवर जाणार होतो. त्यामुळे शारीरिक, मानसिक क्षमता वाढवणं खूप महत्त्वाचं होतं. त्याची सुरुवात आम्ही ६-७ महिने आधीपासूनच केली होती. ६३ वर्षांची मनीषा मानसिक आणि शारीरिक दोन्ही तयारी करत होती. जयश्री, स्मिता, सीमा, आरती, विद्या, रत्ना, सुरेश, सुनील पर्वत चढण्याचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी तर रोहित मानसिक, आध्यात्मिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि मी आंतरिक शांतता, समाधान आणि आपली सहनशीलता जोखण्यासाठी हे धाडसी पर्यटन करणार होतो. रोज सकाळी ५ वाजता उठून दीड ते २ तास धावणं, योगासनं, ‘जिम’मधले व्यायाम, जवळपासचे डोंगर चढणं, पोहणं असे सगळे व्यायाम आम्ही नियमित करीत होतो. टीव्ही, मोबाइल, मित्रमैत्रिणींना भेटणं यामध्ये अजिबात वेळ न घालविता उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक अन्न खात होतो. कारण आमचं ध्येय होतं… युनाम!

पुणे ते नग्गर आणि तिथून ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने बांधलेला ९.०२ किमी लांबीचा अफाट ‘अटल टनल’ म्हणजे हिरव्यागार पर्वतांमधून, बियास नदी, असंख्य धबधबे असलेला भाग ओलांडून खडकाळ, खुरट्या वनस्पती असलेल्या लाहौलला नेणारा रस्ता! सुरुवातीला थोडीफार कोठे तरी कोबीची शेती, मातीच्या, दगडाच्या विविध रंगाच्या छटा, उंच पर्वतावरील हँगिंग ग्लाशिअर, तर आणि सोबतीला खळखळणारी नदी हे हिमालयाचे सौंदर्य सगळ्यांना मंत्रमुग्ध करीत होते. जिस्पा, झिंगझिंगबार आणि शेवटी भरतपूर येथील बेस कॅम्प असा प्रवास आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही करीत असणारा acclmatization walk (खालून उंच ठिकाणी जाऊन परत येणं) आम्हाला या विरळ, कमी ऑक्सिजन असलेल्या हवेशी जुळवून घेत होता. आमच्या बरोबर असलेले शेर्पा अगदी प्रेमाने आणि आपुलकीने गरमागरम आयतं जेवणाचं ताट वाढून या थंड वातावरणात आमच्यातली ऊर्जा वाढविण्यास मदत करीत होते.

खरी परीक्षा सुरू झाली ती १६ हजार फूट वरती असलेल्या भरतपूरपासून. दुसऱ्या दिवशी १७ हजार फूट आणि तिसऱ्या दिवशी १८ हजार फूट उंचीवर जाऊन थंडगार नदीचा प्रवाह ओलांडत आम्ही वर खाली करत होतो. जेव्हा खाली यायचो तेव्हा सगळ्यांची ऑक्सिजनची पातळी ८० टक्क्यांच्या आसपास व्हायची! घरी असताना आपली ऑक्सिजनची पातळी ९०च्या खाली आली की रुग्णालयात दाखल करायची स्थिती! पण इथे ते अगदी ६०-७४ टक्के सुद्धा होत होतं. ज्यांचं ६० टक्के झालं ते खाली नग्गरला परतलेच, पण ज्याचं ७४ टक्के होतं त्यांनी ते २-३ तासांत ८० टक्क्यांवर आणलं. अर्थात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम आखली होती त्या ‘ओअॅसिस अॅडव्हेंचर’च्या आनंद माळी सरांनी त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतरच मोहीम पुढे सुरू झाली.

एवढं सगळं होईपर्यंत आमची जेवणावरची इच्छाच उडून गेली होती. शरीरातली ऊर्जा टिकून राहावी म्हणून ५०० ते १००० कॅलरीज मिळतील एवढं अन्न कसंबसं पोटात ढकलत होतो. खर्च मात्र होत होते २५०० ते ३५०० कॅलरीज. हे आवक-जावकचं गणित अवघड होतं. प्रचंड थंडगार वातावरण आणि रात्री अधूनमधून येणारा भूस्खलनाचा दचकवणारा आवाज उबदार स्लीपिंग बॅगमध्ये झोप घेऊ देत नव्हता. आणि अशावेळी जर शरीरविधीसाठी उठायचं झालं तर आधी स्लीपिंग बॅगची चेन, नंतर टेन्टची चेन उघडून बाहेर येणं म्हणजे कसोटीच होती. आमच्या सगळ्यांच्याच सहनशीलतेची सीमा बघणं सुरू होतं.

शिखरावर जायच्या दिवशी आम्ही सकाळी साडेआठ निघून १७ हजार फुटावरच्या कॅम्प १ वर साडे अकराच्या आसपास पोहोचलो. त्यानंतर पुढे पावसाळी वातावरणात १८ हजार फूट कॅम्पवर पोहोचण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता निघून साडेसातच्या आसपास पोहोचलो. त्यानंतर आम्ही सगळे रात्री साडेबारा वाजता उठून पुन्हा ६ तास चालून २० हजार ५० फुटावरच्या युनाम शिखरावर पोहोचणार होतो. हाडं गोठवणारा वारा, उणे १० सेल्सिअस वातावरण असूनही अतिशय उत्साही असणारे आम्ही सगळे डोक्यावरच्या टॉर्चच्या प्रकाशात मार्गस्थ झालो. पहाटे ५च्या आसपास या पावसाळी वातावरणामध्येही सूर्यदर्शनामुळे आकाशात विविध रंगाच्या छटा व त्या प्रकाशात त्या उंचीवरून भव्यदिव्य दिसणाऱ्या हिमालयाला बघून आम्ही नतमस्तक झालो. झंस्कार पर्वतरांगा, चंद्रभागा पर्वतरांगा अतिशय सुंदर दिसत होत्या. डाव्या बाजूला बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला हिरवागार पाण्याचा एक तलाव मुकुटामधील हिरव्या पाचूसारखा लखलखत होता. इतक्यात अचानक हिमवर्षाव सुरू झाला आणि आता पाच पावले टाकण्यासाठीही मेहनत आणि वेग वाढविणं अवघड वाटू लागलं. पण आम्ही सगळेच जण एका निर्धाराने वर जात राहिलो आणि अखेर युनामच्या शिखरावर पोहोचलो.

अर्थात आमच्या समोरचं आव्हान संपलेलं नव्हतंच. बर्फ पडल्यामुळे निसरड्या झालेल्या दगडांवरून खाली उतरणं चढण्यापेक्षाही कठीण होत होतं. गंमत म्हणजे ज्या दगडांवरून आम्ही वर गेलो होतो तिथून परतताना ती पायवाटही नव्हती हे सूर्यप्रकाशामुळे लक्षात आलं. आणि त्या शेजारी असणारी खोल दरी छातीत धडकी भरवत होती. परंतु शिखर चढल्याच्या आनंद आणि समाधानाने मन शांत झालं होतं. आम्ही सावकाश खाली आलो. मी, स्मिता, विद्या, सीमा संध्याकाळी ५ पर्यंत कॅम्प २, कॅम्प १ व भरतपूरपर्यंत उतरून त्याच दिवशी खाली आलो. आणि स्वत: बनविलेला बटाटा रस्सा, भात पोटभर जेवून झोपलो. इतर सगळे ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी आल्यावर एक धाडसी पर्यटन संपवून दुसऱ्या आनंददायी स्पिती पर्यटनासाठी सुरुवात केली.

गिर्यारोहण धाडसी प्रकारात मोडत असलं तरी शारीरिक मेहनतीत सातत्य व मानसिक कणखरपणा आणला तर तो तितकासा कठीण नसावा. मोहीम पूर्ण केल्यानंतरचा आनंद अपरिमित. हे शिखर चढण्यासाठी आलेल्या माझ्याबरोबरच्या मैत्रिणींना पाहून मी एवढंच सांगेन की अनेकींना हे करता येणं शक्य आहे. वय वाढलेलं असलं तरीही. मी आता मासिक पाळी जाण्याच्या वयात आहे, त्यामुळे मन अनेकदा अस्थिर असतं, किंवा पाळी गेल्यामुळे माझं वजन वाढत आहे, किंवा आता मी वयाची साठी ओलांडलेली आहे, अशा सारखी कारणे देत अनेक जणी याचा विचार करायलाही तयार होत नाहीत. शिवाय त्यांना घरून पाठिंबा मिळेलच असंही नाही. अर्थार्जन करून घर व्यवस्थित सांभाळत असूनही एखादी अशी १० ते १५ दिवस स्वत:साठी बाहेर निघाली की घरातल्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा नाराजीच दिसते. पर्यटन आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांशी संबंधित पुस्तकांसाठी खास ओळखले जाणारे प्र. के. घाणेकर यांचं वाक्य मुद्दाम लक्षात घेण्यासारखं. ते म्हणतात, ‘‘गडकोट काबीज करणं सोपं आहे, पण सर्वात कठीण आहे ते उंबरठागड ओलांडणं.’’

पण एक मात्र मान्य करायलाच हवं, असं पर्यटन आपल्याला आपल्या मर्यादांवर मात करायला शिकवतं. आम्ही खाण्यासाठी जिभेवरती राखलेला संयम आणि ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता, वयाचं कारण न देता पहाटे उठून स्वत:वर सातत्यानं घेतलेली मेहनत आमच्या क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी पडली, पण त्याचमुळे आता आणखी काही शिखरे खुणवायला लागली आहेत…

dr.a.thombare@gmail.com