आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करत मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकऱणी बिभव कुमार यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

आता स्वाती मालीवाल यांनी भाष्य करत नेमकं त्यांच्याबरोबर काय घटलं? याबाबत घटनाक्रम सांगितला आहे. तसेच मारहाणीच्या आरोपानंतर स्वाती मालीवाल या ‘आप’च्या खासदारकीचा राजीनामा देणार का? असा सवाल अनेकांनी केला होता. यासंदर्भातही स्वाती मालीवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : मारहाणीच्या घटनेसंदर्भात बोलताना स्वाती मालीवाल भावूक; म्हणाल्या, “माझं काय होईल? माझ्या करिअरचं…”

स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?

“मला खासदारकीच्या पदाची काहीही लालसा नाही. जर मला प्रेमाणे सांगितलं असतं तर मी खासदारकीचा राजीनामा दिला असता. राजीनामा द्यायला मला काहीही अडचण नव्हती. कोणत्याही पदासाठी मी बंदिस्त नाही. मला असं वाटतं की मी खूप काम केलं आहे. कोणतही पद नसलं तरीही मी करू शकते. मात्र, ज्या पद्धतीने मला मारहाण करण्यात आली. त्यामुळे आता जगातील कोणतीही शक्ती आली तरी मी खासदारकीचा राजीनामा देणार नाही. मला माहिती मिळत आहे की, यामुळेच मला टार्गेट केलं जात आहे. मात्र, मी राजीनामा देणार नाही”, असं स्वाती मालीवाल म्हणाल्या.

‘आप’मधून कोणी संपर्क साधला का?

मारहाण झाल्याच्या आरोपानंतर पक्षाच्यावतीने तुमच्याशी कोणी संपर्क साधला का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्याशी खासदार संजय सिंह यांनी संपर्क साधला होता. कारण त्यांना पक्षाने संपर्क करण्यास सांगितलं असेल. त्यानंतर माझ्या काही पक्षातील जवळच्या लोकांनीही संवाद साधला होता. मात्र, ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माझ्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही”, असं स्वाती मालीवाल म्हणाल्या. आप आदमी पक्षातील तीन नेत्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामध्ये तुमचं नाव होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, “मी माझ्याबाबत सांगू शकते. माझ्याशी अशी कोणतीही माहिती आलेली नाही. जर मला प्रेमाणे सांगितलं असतं तर मी पक्षासाठी जीव दिला असता. मग खासदारकी तर छोटी गोष्ट आहे”, असं स्वाती मालीवाल म्हणाल्या.

केजरीवालांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीच्या आरोपावर पहिल्यांदा भाष्य केलं. ते म्हणाले की, “मला या प्रकरणात निष्पक्ष तपास आणि न्याय हवा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही टिप्पणी केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी आशा आहे”, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.