सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड घटनाविरोधी ठरवत रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजपा व प्राप्तिकर विभागावर गंभीर आरोप केले आहेत. “आमच्याकडे आता वीजबील भरण्यासाठीही पैसे नाहीत”, अशी उद्विग्न व्यथा अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
काय म्हणाले अजय माकन?
“आम्ही जारी केलेले धनादेश बँका वठवत नाहीयेत”, असा दावा करत अजय माकन यांनी बँक खाती गोठवल्याचा आरोप केला. “आत्ता आमच्याकडे खर्चासाठी पैसेच नाहीयेत. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीयेत. सगळंच प्रभावित झालं आहे. फक्त भारत न्याय यात्राच नाही, काँग्रेस पक्षाच्या सर्व राजकीय प्रक्रियांवर परिणाम झाला आहे. आम्हाला पक्षनिधी स्वरूपात लोकांकडून पैसे येत होते आणि त्यातून आम्ही खर्च भागवत होतो. पण आता लोकांना प्रश्न पडेल की आम्ही दिलेला पैसा पक्षाला पोहोचतच नाहीये, मग आपण पैसे द्यावेत की नाही?” असं अजय माकन म्हणाले.
“देशात लोकशाही गोठली”
दरम्यान, “ही फक्त काँग्रेस पक्षाची खाती गोठवली नाहीयेत, तर आपल्या देशात लोकशाही गोठली आहे”, अशी टीका अजय माकन यांनी केली. “लोकसभा निवडणुका जाहीर व्हायला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवून हे सरकार काय सिद्ध करू इच्छित आहे? कोणत्या आधारावर ही खाती गोठवली जात आहेत हे जर मी तुम्हाला सांगितलं तर ते हास्यास्पद वाटेल. काल संध्याकाळी युवक काँग्रेसची खातीही गोठवली आहे. त्यातून २१० कोटींची एकूण रिकव्हरी प्राप्तिकर खात्याने मागितली आहे”, असं अजय माकन म्हणाले.
“हे कुठल्या बलाढ्य उद्योगपती किंवा कॉर्पोरेट टॅक्सचे पैसे नाहीयेत. हे पैसे आम्ही ऑनलाईन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत. या पैशातल्या ९५ टक्क्यांहून जास्त पैसा १०० रुपयांपेक्षाही कमी स्वरुपात यूपीआयच्या माध्यमातून लोकांनी जमा केला आहे. युथ काँग्रेसच्या सदस्यत्वासाठीच्या शुल्क स्वरुपात गोळा झालेला पैसा युवक काँग्रेसच्या खात्यांमध्ये आहे. तो पैसा प्राप्तिकर विभागानं गोठवला आहे. हे वेदनादायी आहे”, अशा शब्दांत अजय माकन यांनी टीका केली आहे.
“तिकडे भाजपा कॉर्पोरेट बाँड्सचा पैसा खर्च करतेय”
“दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने ज्या कॉर्पोरेट बाँड्सचा पैसा सर्वोच्च न्यायालयानं घटनाविरोधी ठरवला तो पैसा भाजपाकडे आहे आणि ते खर्च करत आहे. मग देशात लोकशाही कुठे जिवंत राहील? त्यामुळे देशात लोकशाही संपुष्टात आली आहे. ही काँग्रेसच्या खात्यांची टाळेबंदी केलेली नसून लोकशाहीवरची टाळेबंदी आहे. निवडणूक घोषणांच्या दोन आठवडे आधी अशा प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षाची खाती गोठवली जाते, तेव्हा लोकशाहीपेक्षा त्याहून जास्त चिंतेची बाब कुठली असू शकत नाही. देशात फक्त एकाच पक्षाची व्यवस्था राहणार आहे का? इतर सर्व पक्षांची खाती गोठवली जाणार का? इतर पक्षांना अस्तित्वात राहण्याचा अधिकारच नाही का?” असे उद्विग्न प्रश्नही अजय माकन यांनी उपस्थित केले आहेत.
