Atleast 4 Dead In Ladakh After Statehood Protest Turns Violent: लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शिक्षणतज्ज्ञ आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बुधवारी त्यांचे १५ दिवसांचे उपोषण मागे घेतले. यावेळी झालेल्या हिंसाचारात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.
आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. लडाखला राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू ठेवावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. केंद्र सरकार आणि लडाखच्या प्रतिनिधींमध्ये ६ ऑक्टोबर पासून पुन्हा चर्चा सुरू होणार आहे.
सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया
पोलिसांच्या गोळीबारात तीन ते पाच तरुणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, असा दावा वांगचुक यांनी केला आहे.
‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक म्हणाले की, “मला तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की लेहमध्ये एका आंदोलनादरम्यान तोडफोड झाली. अनेक कार्यालये आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.”
ही जेन झेड क्रांती
ते पुढे म्हणाले की, “हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. काही लोकांना वाटते की ते आमचे समर्थक होते. संपूर्ण लेह आमचे समर्थक आहे. हा तरुणांचा राग आहे, ही जेन झेड क्रांती आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून बेरोजगार आहेत. त्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. मी नेहमीच म्हणतो की, तरुणांना बेरोजगार ठेवणे आणि त्यांचे लोकशाही अधिकार हिरावून घेणे सामाजिक अशांततेचे कारण आहे.”
हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू नये
“मी लडाखच्या तरुणांना आवाहन करतो की त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू नये. कारण त्यामुळे माझे पाच वर्षांचे प्रयत्न निष्फळ होतील. मी इतकी वर्षे उपोषण करत आहे आणि शांततेत मोर्चा काढत आहे आणि नंतर हिंसाचाराचा अवलंब करणे हा माझा मार्ग नाही. मी तरुण पिढीला शांततेच्या मार्गाने सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन करतो. सरकारने शांततेचा संदेश ऐकावा, अशी माझी इच्छा आहे. जेव्हा ते शांततापूर्ण निदर्शने आणि मोर्चांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा अशा परिस्थिती उद्भवतात,” असेही वांगचुक म्हणाले.
