Amit Shah On Bihar Elections 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून १२१ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. बिहारची जनता एनडीएला कौल देते की महाआघाडीला? की जन सुराज्य पक्षाला? हे आता मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठा दावा केला आहे.

‘बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीए १६० पेक्षा जास्त जागा जिंकेल’, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. तसेच बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या कामगिरीवर अमित शाह यांनी विश्वास व्यक्त करत युतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया टुडे टीव्हीच्या मुलाखतीत बोलताना अमित शाह यांनी हा दावा केला आहे.

अमित शाह काय म्हणाले?

“बिहारमध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. एनडीएबाबत लोकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. आम्ही बिहारमध्ये १६० हून अधिक जागा जिंकू”, असं अमित शाह म्हणाले. तसेच भाजपा आणि जेडी (यू) दोन्ही आघाडी समान कामगिरी करतील का? असं विचारलं असता अमित शाह म्हणाले की, “त्यांचा स्ट्राइक रेट किमान समान असेल.”

अमित शाह पुढे म्हणाले की, “बिहारमध्ये सरकारी, खासगी आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पुढील दोन वर्षांत प्रत्येकाचं प्रमाण निश्चित केलं जाईल. आतापर्यंत ११ वर्षांत आम्ही बिहारमधील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा रस्ते, पूल, वीज प्रकल्प, मजबूत करण्याचं काम केलं आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा मोदींनी आधीच विकसित केल्या आहेत. राज्यात अनेक मोठे उद्योग येत आहेत”, असं शाह म्हणाले.

“इथेनॉल उत्पादनात बिहार आता देशात पहिल्या क्रमांकावर आहे. बरौनी येथील खत प्रकल्पाचं काम सुरू असून दोन मोठे वीज प्रकल्प बांधले जात आहेत. एक भव्य पीएम मित्र पार्क, एक कापड पार्क देखील उभारलं जात आहे. नऊ औद्योगिक वसाहती विकसित करण्यात आल्या आहेत”, असंही यावेळी अमित शाहांनी सांगितलं.

बिहार निवडणुकांबाबत ओपिनियन पोल काय सांगतात?

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. दरम्यान, त्याआधी आयएनएस मॅटराइजने म्हटलं आहे की एनडीएला १५३ ते १५६ जागा मिळू शकतात. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला ७६ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.