नवी दिल्ली: भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये बैठकांचे सत्र सुरू असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये १०० ते १२० उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची पहिली यादी पुढील दोन-तीन दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी काही वरिष्ठ नेत्यांचाही या यादीमध्ये समावेश असेल. हे नेते अनुक्रमे वाराणसी, गांधीनगर, लखनौ या प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघांतून लढणार आहेत. राज्यसभेचे सदस्य असलेले तसेच, वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ नुकताच संपलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यामुळे पीयूष गोयल, मनसुख मंडाविया, निर्मला सीतारामन, राजीव चंद्रशेखर, नारायण राणे, भूपेंदर यादव, धर्मेद्र प्रधान, पुरुषोत्तम रुपाला या मंत्र्यांचीही नावे यादीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. २०१९ मध्ये पराभूत झालेल्या वा दुसऱ्या क्रमाकांची मते मिळालेल्या १६० हून अधिक लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचीही घोषणा पहिल्या यादीमध्ये केली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, आज हजर राहण्याचे निर्देश

कोअर ग्रुपच्या बैठका

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी बुधवारी भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिवसभर कोअर ग्रूपचीही बैठक झाली. या बैठकीमध्ये संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह राष्ट्रीय महासचिव तसेच, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड अशा आठहून अधिक राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी उपस्थित होते. उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये या राज्यांमधील काही मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित होतील. चार दिवसांपूर्वी भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमधील उमेदवार निवडीसाठीही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये नड्डा, शहा तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांतील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी नड्डांनी काही भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांचा समावेश होता. या मॅरेथॉन बैठकांमध्ये बहुतांश राज्यांतील भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या निवडीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

पायंडा मोडला! 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १३ मार्चनंतर घोषित केला जाणार असला तरी, त्याआधीच भाजप उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाईल. २०१९ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिली यादी घोषित केली होती पण, या वेळी हा पायंडा मोडला जाईल. वास्तविक, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही पक्षाने निवडणूक कार्यक्रम निश्चित होण्याआधीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.