BJP Slams Rahul Gandhi Over Caste Census : केंद्र सरकारने आज (३० एप्रिल) देशात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. आगमी जनगणनेत जातीनिहाय गणना केली जाणार आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या निर्णयाबद्दल सरकारचं कौतुक केलं आहे. दरम्यान भाजपाने मात्र या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून राहुल गांधी यांना सुनावले आहे.

राहुल गांधी या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबरोबरच भाजपाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे २०२४ मधील एक विधान देखील शेअर केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले होते की जातीनिहाय जनगणना करण्याचा कोणताही निर्णय जनगणना जाहीर झाल्यावर सार्वजनिक केला जाईल.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे कारण अमित शाह यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजीच ही घोषणा लवकरच होणार असल्याचे संकेत दिले होते.

“राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे. केंद्रीय गृहमंक्षी अमित शाह यांनी यापूर्वीच १८ सप्टेंबर २०२४ रोजी ही घोषणा लवकरच होणार असल्याबद्दल सूचित केले होते. २०२१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना सुरू केली, ज्यामध्ये जातीय घटकाचा समावेश होता- १९३१ नंतर करण्यात आलेला हा पहिलाच असा प्रयत्न होता,” असे मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लावून धरली होती. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायला उशीर केला आहे, पण ठीक आहे, आता त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी.”

तसेच राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून यामध्ये जातीनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “म्हणालो होतो ना, मोदींना जातिनिहाय जनगणना करावीच लागेल, आम्ही करायला भाग पाडू. हे आमचे व्हिजन आहे आणि आम्ही काळजी घेऊ की सरकार एक पारदर्शक आणि प्रभावी जातिनिहाय जनगणना करेल. देशाच्या संस्था आणि पॉवर स्ट्रक्चरमध्ये कोणाची किती भागिदारी आहे हे सर्वांना स्पष्ट कळावे. जातिनिहाय जनगणना हा विकासाचा नवा मार्ग आहे. मी त्या लाखो लोकांना आणि सर्व संघटनांना शुभेच्छा देतो जे याची मागणी करत मोदी सराकराविरोधात लढाई लढत होते- मला तुमचा अभिमान आहे,” असे राहुल गांधी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

राहुल गांधी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले, “सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र आमच्या काही मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे सरकारने आम्हाला तारीख सांगावी. जातीनिहाय जनगणना कधी सुरू करणार व अंतिम अहवाल कधी सादर करणार याची तारीख आम्हाला सांगायला हवी.”

“सरकारने जातीनिहाय जनगणनेला उशीर केला असला तरी हे काम आता तातडीने व्हायला हवं. या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचंही आम्ही स्वागत करतो. सरकारने आमचं स्वप्न निवडलं हे एक चांगलं काम केलं आहे. आता त्यांनी आम्हाला तारखा सांगाव्यात. जातीनिहाय जनगणना कधी सुरू करणार, कधीपर्यंत काम संपवून अहवाल सादर करणार? नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनगणनेसाठी निधीची तरतूद केली नव्हती. मात्र आता तशी तरतूद करावी लागेल. आगामी अर्थसंकल्पात तशी तरतूद करणार का? या प्रश्नांची उत्तरं द्यावी,” असेही राहुल गांधी म्हणाले.