काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पंजाबमध्ये झालेल्या या राजकीय भूकंपाची मोठी चर्चा राष्ट्रीय स्तरावर सुर झाली. राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करतानाच आगामी काळात ‘सर्व पर्याय खुले’ असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर आता काँग्रेसमधील गांधी घराण्यासोबत असलेल्या आपल्या संबंधांविषयी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आपल्या मुलांसारखे आहेत, असं देखील अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या राजीनाम्याविषयी कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणतात, “मी तीन आठवड्यांपूर्वीच आपला राजीनामा देण्याची तयारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दाखवली होती. पण त्यांनी मला थांबायला सांगितलं. जर त्यांनी मला बोलवून पायउतार व्हायला सांगितलं असतं, तर मी तेव्हाच राजीनामा दिला असता. एक लढवय्या सैनिक म्हणून मला माझं काम कसं करायला हवं हे चांगलंच माहिती आहे आणि ते कधी थांबवायला हवं हे देखील ठाऊक आहे”, असं देखील ते म्हणाले.

…हे असं संपायला नको होतं!

दरम्यान, यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची देखील आठवण काढली. “प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे मला माझ्या मुलांसारखे आहेत. हे सारं असं संपायला नको होतं. मी यामुळे फार दु:खी झालोय. हे दोघेही अननुभवी आहेत. त्यांचे सल्लागार त्या दोघांना चुकीचं मार्गदर्शन करत आहेत”, असा आरोप देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यावेळी केला.

अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू!

आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंग चन्नी यांची नियुक्ती झाली असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पवित्रा घेतला आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्यामध्ये विस्तवही जात नसताना आता अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांच्याविरोधात थेट आघाडी उघडली आहे. अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चन्नी हे राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत सुखजिंदरसिंग रंधवा आणि ओ. पी. सैनी या दोन उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चन्नी

बुधवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका केली. “पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड होऊ नये, यासाठी मी लढा देईन. देशाला अशा प्रकारच्या धोकादायक माणसापासून वाचवण्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार होतो”, असं देखील ते म्हणाले.

नवज्योतसिंग सिद्धूंविरुद्ध ताकदवान उमेदवार देणार

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात ताकदवान उमेदवार उभा करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. “नवज्योतसिंग सिद्धू यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचा कोणताही प्रयत्न मी हाणून पाडेन. त्यांचा पराभव व्हावा म्हणून २०२२च्या निवडणुकांमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवार उभा करीन. ते राज्यासाठी धोकादायक आहेत”, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमरिंदर सिंग यांनी सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केलं होतं. मात्र, अद्याप त्यांनी काँग्रेस सोडण्याचा किंवा इतर कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain amrinder singh on rahul gandhi priyanka gandhi navjyot singh siddhu after resignation pmw