मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने २४ मार्चला अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. सूरत न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींना अपात्र ठरवून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेमुळे वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “डोकं अदाणींचं अन् पैसा मोदींचा”, अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जगातील…”

राजीव कुमार यांनी आज ( २९ मार्च ) कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तेव्हा राहुल गांधींच्या अपात्रतेमुळे वायनाड येथे पोटनिवडणूक कधी लागणार? असा सवाल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी असतो. न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. कोणतीही घाई नाही,” असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “१९८४ साली काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता, पण…”, पंतप्रधान मोदींचं विधान

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव?

दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर २४ तासांतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अपात्र ठरवलं. या निर्णयामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्षांविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्ष ओम बिर्लांविरूद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहे. सोमवारी ( ३ मार्च ) लोकसभेत हा ठराव आणणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief election commissioner rajiv kumar on rahul gandhi wayanad by poll election ssa