Devendra Fadnavis Alliance for BMC Election: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहेत. लवकरच या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्याआधी महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे राज ठाकरेंच्या संभाव्य प्रवेशामुळे महाविकास आघाडीत विसंवाद होऊ लागल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे महायुती नेमका काय निर्णय घेणार? याची मोठी उत्सुकता मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचं काय धोरण असेल? याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकार मंडळींसाठी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या. यावेळी राज्यातील इतर महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्याअनुषंगाने राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांसोबत की स्वतंत्र? या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
“मुंबई महानगर पालिका निवडणूक सोबतच”
राज्याची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या किल्ल्या कुणाच्या हाती राहणार? याचा फैसला या निवडणुकांमधून होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि केंद्रातदेखील सत्तेवर असणाऱ्या भाजपाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेत एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांना वाटेकरी करून घेण्यास भाजपानं होकार दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
“आम्ही तिघांनीही मिळून असा निर्णय घेतला आहे की ज्या ठिकाणी तिघांचीही ताकद आहे, त्या ठिकाणी एकत्र लढून काहीही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्रच लढले पाहिजे. मात्र, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. मुंबई महानगर पालिकेत महायुतीला १०० हून अधिक जागा मिळतील व बहुमताचा आकडा आम्ही नक्कीच पार करू. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर असेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली.
ठाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांना विचारूनच – मुख्यमंत्री
दरम्यान, मुंबईबाबत सत्तेतील तिन्ही प्रमुख मित्रपक्षांमध्ये सहमती झाली असली, तरी अद्याप माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. “मुंबईत आम्ही एकत्र लढणार असलो, तरी ठाण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. जर ते म्हणाले युतीत लढू, तर युतीत अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाऊ”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे महानगर पालिकेत महायुती स्वतंत्र लढणार!
एकीकडे मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार असले, तरी पुणे महानगर पालिका निवडणुकीत मात्र महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीदेखील ताकद असून दुसरीकडे भाजपाचाही वरचष्मा दिसून आला आहे. पुण्यासोबतच अजित पवारांचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतही महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. नवी मुंबईतदेखील हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळतील.
निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र येणार?
दरम्यान, मुंबई वगळता जवळपास इतर सर्व महत्त्वाच्या महानगर पालिकांमध्ये महायुती स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांच्या विधानांवरून स्पष्ट झालेलं असतानाच त्यांनी निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र येण्याचेही संकेत दिले आहेत. “या महानगर पालिकांमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत असलो, तरी निवडणुकांनंतर आम्ही पुन्हा युती करू. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना फायदा होऊ देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
