भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका आरोपाला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या बुधवारी (१ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यामुळे एका पत्रकाराला बाहेर काढण्यात आल्याचा अमित मालवीय यांनी आरोप केला आहे. ह्या आरोपावर प्रत्युत्तर देत टोला लागवताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “भाजप नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “आज एका ज्येष्ठ पत्रकाराला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारल्यामुळे बाहेर काढण्यात आलं. हेच राहुल गांधी प्रेम आणि सहिष्णुतेच्या राजकारणाबद्दल बोलतात?” दरम्यान, अमित मालवीय यांच्या या ट्विटवर पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “अशा प्रकारची नशा तुमच्यासाठी घातक आहे. हे प्राणघातक देखील असू शकतं. त्वरित जवळच्या व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधा.”

नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. वाढत्या महागाईवरून भाजप सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले होते की, जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल. इतकंच नव्हे तर राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप देखील केले होते. याच पत्रकार परिषदेबाबत भाजपाच्या अमित मालवीय यांनी असा आरोप केला कि, एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं होतं. ज्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे. मोदीजींचे केवळ ४-५ उद्योगपती मित्रांना नोटाबंदीचा लाभ मिळत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत, असे असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज भारताची मालमत्ता विकली जात आहे पण हा पैसा कुठे जातो हा प्रश्न आहे, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला.

“लोकांचा आवाज दडपला जात आहे, संसदेत चर्चा होऊ देत नाही, ज्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. शेतकऱ्यांपासून मजूर, छोटे व्यापारी, पगारदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींसाठी नोटाबंदी झाली. पण मोदीजींच्या ४-५ मित्रांसाठी या दरम्यान कमाई झाली आहे आणि वारंवार आर्थिक व्यवहार करण्यात आले”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आता भाजपा नेत्याने राहुल गांधींना सांगितला GDP चा नवा अर्थ, म्हणाले.. “जी से गांधी, डी से…”

…तर मोदींनी काँग्रेसकडे मदत मागावी!

राहुल गांधी असंही म्हणाले, “१९९१ ते २०१२ मधे जे धोरण होतं ते आता राबवलं जात नाहीये. नरेंद्र मोदी म्हणाले मी नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केलं नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडिया चा काय झालं? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे.  १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आलं होतं. त्यावेळी काँग्रेसनं नवा दृष्टीकोन स्वीकारला. आजही तीच गरज आहे.  काँग्रेसच्या मनात स्पष्ट कल्पना आहे. पण ही गोष्ट अर्थमंत्री, नीती आयोग, थिंक टॅक्स यांना समजतच नाही. पंतप्रधानांनी हवं तर काँग्रेसकडे मदत मागावी, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader pawan khera for rahul gandhi criticizes amit maviya gst