Congress Mallikarjun Kharge Demand amit shah resignation : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. यासोबतच अमित शाह यांच्या बचावासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ओळीने पोस्ट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील खरदे यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “ज्या विचारधारेला आंबेडकर मानत नव्हेत, स्वर्ग आणि नरक याबद्दल ते कधीही बोलले नाहीत. त्यावरून त्यांचे (भाजपा) गृहमंत्री विधान करतात. तर मोदींनी त्यांचा बचाव करण्यासाठी सहा ट्वीट केले. काय गरज होती? जर कोणी बाबासाहेबांविरोधात चुकीचे बोलले तर त्याला आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे होते, पण दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. दोघे एकमेकांच्या पापाला पाठिंबा देतात. यांनी जर काही पाप केले तर ते सपोर्ट करतात, त्यांनी काही पाप केलं किंवा चुकीचे विधान केले तर मोदी पाठिंबा देतात”.

खरगे पुढे बोलताना म्हणाले की, “मला मोदींकडून हे जाणून घ्यायचं आहे की, जो व्यक्ती आणि ज्या संविधानाची तुम्ही चर्चा करत आहात. या ग्रंथाला पवित्रा मानून तुम्ही सगळ्यांशी बोलत आहात. खरंतर मोदींनी याला कधीही सन्मान दिला नाही. याला रामलीला मैदानात जाळण्यात आले. आम्ही देशासाठी तयार केलेल्या तिरंगा झेंड्याला देखील नाकारले, त्यांचे म्हणणे होते की हे संविधान आपले नाही, हे मनूच्या लाईनवर नाही म्हणून आम्ही हे मानत नाही. त्यांनी नेहरू, गांधी, आंबेडकरांचे फोटो जाळले, तिरंगा झेंड्याचा देखील यांनी तिरस्कार केला. हेच त्यांच्या मनात आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे विधान केले.”

केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करताना खरगे म्हणले की, “जर एखादा व्यक्तीच्या मनात त्यांच्यासाठी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) श्रद्धा असती, त्यांच्याबद्दल अभिमान असता तर ते ही गोष्ट तो व्यक्ती बोलला नसता. त्यामुळे आमची मागणी आहे की, अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जर मोदींना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडीही श्रद्धा असेल तर रात्री १२ वाजण्याच्या आधी त्यांना (अमित शाह) बरखास्त केले पाहिजे.”

“आमची मागणी ही आहे की, जो व्यक्ती संविधानाची शपथ घेऊन मंत्री बनतो आणि तो त्याच संविधानाचा अपमान करत असेल तर त्याला मंत्रिमंडळात राहाण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना बरखास्त केला पाहिजे, तरच देशातील लोक शांत राहातील. अन्यथा सगळीकडे बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देतील. त्यांच्यासाठी जीव द्यायलाही लोक तयार आहेत”, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

काय म्हणाले होते अमित शाह?

मंगळवारी राज्यसभेत बोलताना अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत केलेल्या विधानावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “हल्ली फॅशनच झाली आहे. “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल”, असं अमित शाह म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mallikarjun kharge demand amit shah resignation over dr babasaheb ambedkar controversial statement row slam pm modi rak