पीटीआय, भुवनेश्वर
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून गैरप्रकाचे प्रयत्न होत आहत. परंतु ‘इंडिया’ आघाडी भाजपचा हा डाव हाणून पाडेल, असा इशारा काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. भाजपकडून देशभरात संविधानावर हल्ले होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
भुवनेश्वर येथे पक्षाच्या ‘संविधान बचाओ सामवेश’ कार्यक्रमाला संबोधित राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजप सत्तेत असल्यावर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भांडवलदारांसाठी काम करते. ‘जल, जंगल, जमीन’ (पाणी, जंगल आणि जमीन) आदिवासींचे आहे आणि त्यांचेच राहील असे सांगून, ओडिशाच्या भाजप सरकारने पंचायत (अनुसूचित क्षेत्रांमध्ये विस्तार) कायदा, १९९६ अद्याप लागू केला नसल्याचा दावा राहुल यांनी केला.
आदिवासींना वन हक्काचे पट्टे दिले जात नाहीत. काँग्रेसने ‘पेसा’ आणि ‘आदिवासी विधेयक’ आणले आहे. आम्ही हे कायदे लागू करू आणि आदिवासींना त्यांची जमीन मिळेल, याची खात्री करू, असे गांधी म्हणाले. ओडिशातील आधीच्या बिजू जनता दलाने (बिजू) जे केले, त्याप्रमाणेच आताचे भाजप सरकार राज्याला लुटत आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.
‘निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला’
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची गुरुवारी बैठक पार पडली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहारमधील विधानसभा निवडणुका भाजपला हायजॅक करण्यापासून रोखण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) आपले कर्तव्य बजावत नसून भाजपच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.