दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगातच असून नुकतीच त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशात एकीकडे निवडणुकांचं वातावरण तापू लागलेलं असताना आपल्या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करण्यात आल्यामुळे आम आदमी पक्षानं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका सुरू केली आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपचे खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेला संदेश सांगितला आहे.

“माय नेम इज अरविंद केजरीवाल”

काही वर्षांपूर्वी अभिनेता शाहरूख खानचा ‘माय नेम इज खान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील ‘माय नेम इज खान अँड आय एम नॉट ए टेररिस्ट’ हा संवाद बराच चर्चेत आला होता. त्याचप्रमाणे आता अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून तसाच एक संदेश देशवासीयांसाठी पाठवल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. “अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या जनतेसाठी, दिल्लीच्या जनतेसाठी संदेश पाठवला आहे. ‘माझं नाव अरविंद केजरीवाल आहे आणि मी दहशतवादी नाही. माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट ए टेररिस्ट”, असं संजय सिंह म्हणाले.

“अरविंद केजरीवाल यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. पंतप्रधान त्यांच्या द्वेषामध्ये इतके वहावत गेले आहेत की त्यांच्या पत्नी, मुलांना केजरीवाल यांना काचेच्या आडून भेटू दिलं जात आहे. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या पंजाबच्या मु्ख्यमंत्र्यांना दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीची भेट काचेच्या आडून दिली जातेय. यावरून पंतप्रधानांनी हेच दाखवून दिलंय की त्यांच्या मनात अरविंद केजरीवाल यांच्यासाठी द्वेषाची भावना आहे”, असं संजय सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो?

२३ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत दोन वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा ही वाढ करण्यात आली असून आता २३ एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.