Donald Trump Upcoming India Visit Details: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांचे वर्णन “महान व्यक्ती” व “मित्र” असे केले. याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मजबूत करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येऊ शकतात, असे संकेत दिले.
वजन कमी करणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्यासाठी नवीन कराराची घोषणा केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरची त्यांची चर्चा “उत्तम” झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) रशियाकडून तेल खरेदी करणे मोठ्या प्रमाणात बंद केले आहे. ते माझे मित्र आहेत. आमच्यामध्ये चर्चा होते. मी भारतात यावे अशी त्यांची इच्छा आहे. मी भारतात जाणार आहे. पंतप्रधान मोदी एक महान व्यक्ती आहेत.”
पुढील वर्षी भारत दौऱ्याची योजना आहे का, असे थेट विचारले असता ट्रम्प म्हणाले, “होय, असू शकते.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेसाठी भारतात जाण्याची कोणतीही योजना नसल्याचे वृत्त द न्यू यॉर्क टाइम्सने ऑगस्टमध्ये दिले होते. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर भाष्या केल्याने त्यांच्या भारत भेटीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळापत्रकाशी परिचित असलेल्या सूत्रांचा हवाला देत, “नोबेल पुरस्कार आणि एक कठीण फोन कॉल: ट्रम्प-मोदी संबंध कसे उलगडले” या शीर्षकाच्या अहवालात असे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्वाड शिखर परिषदेत उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता ही योजना रद्द करण्यात आली आहे.
भारत-अमेरिका व्यापार तणाव
अमेरिकेच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. याचबरोबर भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे पुतिन यांच्या युक्रेनविरोधातील युद्धयंत्रणेला निधी मिळत असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावल्यामुळे दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. असे असले तरी दोन्ही देश यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
