Yamuna Water Controversy: आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यमुनेचे पाणी जाहीररित्या पिऊन दाखवा, असे आव्हान दिले आहे. शेजारच्या हरियाणा राज्यात यमुनेच्या पाण्यात विष कालवले जात असल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आव्हान दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघा एक आठवडा उरला आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीतील यमुनेच्या पाण्यातील अमोनियाची पातळी वाढली असून ती ७ पार्ट्स प्रति मिलियन (PPM) एवढ्या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, ७ पीपीएम अमोनिया हे ‘विष’समान आहे. शेजारच्या हरियाणा राज्यातील भाजपा सरकार यमुना नदीला प्रदूषित करत आहे. ज्यामुळे दिल्लीतील जनतेचे आयुष्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री आतिशी आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याला दुजोरा दिला तसेच विरोधकांना यमुनेचे पाणी पिण्याचे आव्हान दिले.

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, अमित शाह, राजीव कुमार, राहुल गांधी, संदीप दीक्षित यांना माझे आव्हान आहे की, तुम्ही माध्यमांसमोर ७ पीपीएम अमोनिया असलेले पाणी पिऊन दाखवा. तुम्हीच दिल्लीत ७ पीपीएमचे पाणी पाठवत असून उलट माझ्यावरच मी खोटे बोलत असल्याचा आरोप करत आहात. यावर केजरीवाल यांना त्यांच्या दाव्याबाबत पुरावा मागण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मग यमुनेच्या प्रदूषणासाठी जबाबदार कोण आहे? कारण पाणी तर पानीपतमधून येत आहे.

केजरीवालांच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये हरियाणा सरकारवर आरोप केले. त्यानंतर भाजपाने यावर प्रत्युत्तर तर दिले आहेच. त्याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची धमकी दिली आहे. तसेच केजरीवाल यांनी माफी मागावी, असेही ते म्हणाले.

राहुल गांधींकडूनही टीका

भाजपाप्रमाणेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच केजरीवालदेखील खोटे बोलतात. पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी म्हटले होते की, यमुना नदीत ते आंघोळ करतील आणि यमुनेचे पाणी पिणार. पाच वर्ष झाले आजवर त्यांनी यमुनेचे पाणी प्यायले नाही. दिल्लीची जनता अस्वच्छ पाणी पिते, पण केजरीवाल कोट्यवधीच्या शीशमहालात बसून स्वच्छ पाणी पितात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drink yamuna water in public arvind kejriwal dares amit shah and rahul gandhi kvg