Elon Musk’s satellite internet venture Starlink: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टारलिंकला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने एक महत्त्वाचा परवाना दिला असून, या परवान्यामुळे स्टारलिंकचा भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेला संबंधित सूत्रांनी शुक्रवारी माहिती दिली आहे. मस्क यांची स्टारलिंक या प्रकरचा परवाना मिळवणारी तिसरी कंपनी आहे. दूरसंचार मंत्रालयाने यापूर्वी युटेलसॅटच्या वनवेब आणि रिलायन्स जिओलाही हा परवाना दिला आहे.
दरम्यान, स्टारलिंक आणि दूरसंचार मंत्रालयाला या प्रकरणाबाबतच्या माहितीसाठी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
मस्क यांची स्टारलिंक कंपनी २०२२ पासून भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवेच्या परवान्यांसाठी वाट पाहत आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे याला विलंब होत आहे.
स्टारलिंक म्हणजे काय?
अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची स्टारलिंक ही एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. मस्क यांच्या कंपनीचे १०० हून अधिक देशांमध्ये हाय-स्पीड डेटा सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. स्टारलिंक इंटरनेट सेवा केबल-आधारित ब्रॉडबँड सेवांपेक्षा वेगळी असून, स्टारलिंक उपग्रह इंटरनेटसेवा आकाशाचे थेट दृश्य असलेल्या कोणत्याही ठिकाणी काम करते. पृथ्वीवरील दुर्गम ठिकाणीही इंटरनेट पुरवणे हा मस्क यांच्या कंपनीचा उद्देश आहे.
Viasat, HughesNet आणि Amazon सारख्या कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. पण स्टारलिंक त्यांच्यापेक्षा पुढे आहे, कारण स्टारलिंक वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकते. मोजक्या मोठ्या उपग्रहांवर अवलंबून राहण्याऐवजी, स्टारलिंक एकमेकांमध्ये सिग्नल प्रसारित करण्यासाठी लेसर असलेल्या अनेक लहान उपग्रहांचा वापर करते.
स्टारलिंकचे इंटरनेट स्पीड
स्टारलिंकचे इंटरनेट स्पीड फायबर किंवा केबल-आधारित सोल्यूशन्सइतके जास्त नसले तरी, जिथे इंटरनेट नाही किंवा वेग खूप कमी आहे अशा ठिकाणी ते खूप उपयुक्त आहे. काही काळापूर्वीपर्यंत स्टारलिंक सुमारे १५० एमबीपीएसची कमाल स्पीड देत होती, परंतु उपग्रहांची संख्या वाढल्यानंतर, अलीकडेच एक्स वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा २६४ केबीपीएस पर्यंत कमाल स्पीड देत असल्याचे दिसून आले आहे.