नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरक्षणबाबतचे विधान त्यांची आरक्षणविरोधी मानसिकता दाखवून देते असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. तसेच देशविरोधी वक्तव्य करणे ही राहुल यांची सवयच आहे असा टोला शहा यांनी लगावला. तर राहुल हे घटनात्मक मूल्यांच्या रक्षणाबाबत बोलत असताना भाजपला का खुपते? असा सवाल काँग्रेसने केला.
भाजप असताना कोणीही आरक्षण नष्ट करू शकणार नाही असे शहा यांनी बजावले. तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी तडतोड केली जाणार नाही असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जॉर्ज टाऊन विद्यापीठात बोलताना भारतात जेव्हा योग्य परिस्थिती निर्माण होईल तेव्हा, काँग्रेस आरक्षण संपवण्याबाबत विचार करेल असे नमूद केले. मात्र सध्या ही स्थिती नाही असेही स्पष्ट केले होते. त्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली. देशाचे विभाजन करू पाहणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे किंवा देशविरोधी वक्तव्ये ही राहुल गांधी यांची सवय आहे असा आरोप शहा यांनी केला. नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देणे किंवा आरक्षणविरोधी विचार हा त्याचाच भाग आहे अशी टीका शहा यांनी केली. राहुल गांधी यांच्या विधानातून काँग्रेसच्या राजकारणाचे स्वरूप उघड झाल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा >>> रस्तेविकासावरून रस्सीखेच; शिरूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ऐवजी ‘एमएसआयडीसी’कडे
घटनेच्या रक्षणाची भाषा -खेरा
घटनेचे रक्षण करण्याची राहुल गांधी यांची भाषा आहे. मग भाजपला अडचण का? असा सवाल काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या इहान ओमर यांनी भेट घेतली. सरकारला या भेटीत आक्षेप वाटत असेल तर त्यांनी अमेरिकेच्या राजदूताला बोलावून कारवाई करावी असा सल्ला खेरा यांनी दिला. पंतप्रधानांनी अनेक वेळा परदेशात भारताबाबत वादग्रस्त टिपप्णी केल्याचा दावा खेरा यांनी केला.
भारतविरोधी व्यक्तीशी चर्चा -त्रिवेदी
भारतविरोधी असा लौकिक असलेल्या लोकप्रतिनिधीला विरोधी पक्षनेत्याने भेटणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी इहान ओमर यांच्या भेटीवरून वाद सुरू आहे. ओमर या भारतविरोधी वक्तव्ये करतात. ओमर यांना पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर नेले होते. तसेच प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयला सहानुभूती दर्शवणारे वक्तव्य केल्याचा दाखला त्रिवेदी यांनी दिला. राहुल यांचे वर्तन यापूर्वी बालिश होते, मात्र आता त्यांचे कृत्य देशाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्रिवेदी यांनी नमूद केले. राहुल अमेरिका दौऱ्यात देशविरोधी भाषा बोलत असल्याची टीका त्रिवेदी यांनी केली.
राजनाथ सिंह यांची टीका
वॉशिंग्टन येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या चीनबाबतच्या वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टीका केली. पाकिस्तानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरण राबवले त्याला राहुल यांनी पाठिंबा दिला. मात्र चीनच्या मुद्द्यावर सरकारने जी हाताळणी केली त्यावर टीका केली होती. अमेरिका-चीन ही स्पर्धा मोदींनी व्यवस्थित हाताळली आहे काय? असा प्रश्न विचारताच, तुम्ही जर चीन लष्कर आमच्या भूमीत चार हजार चौरस किलोमीटर आत आले असेल आणि ही परिस्थिती उत्तम हाताळली असे म्हणत असाल तर असू शकते असा टोला राहुल यांनी लगावला. लडाखमध्ये चीनने भूभाग बळावला आहे. मात्र माध्यमांवर त्यावर लिहिणे आवडत नाही असे राहुल यांनी नमूद केले. त्यावर राहुल गांधी यांनी दिशाभूल करू नये असा सल्ला राजनाथ सिंह यांनी दिला.