केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक नुकतीच संपली आहे. या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत मांडलेल्या तीन ठरावांची माहिती दिली. तसेच त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या समन्वय समितीचे सदस्ये असतील.

इंडियाच्या बैठकीत मांडलेले ठराव

१. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच पूर्ण केली जाईल.

२. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.

३. इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधानांनी एलपीजीच्या किंमतीत २०० रुपये कमी केले. परंतु, ते करण्याआधी त्यांनी गॅसची किंमत अनेक पटींनी वाढवली होती. मोदीजी आधी १०० रुपये वाढवतात आणि मग २ रुपये कमी करतात. एलपीजी आणि पेट्रोलच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. एलपीजीची किंमत २०० रुपयांनी कमी केली, परंतु, ७०० रुपये अद्याप बाकी आहेत. वस्तूंच्या किंमती आधी मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मग त्यात थोडीशी घट करतात. याद्वारे मोदी सरकारने लाखो रुपये कमावले, गोरगरिबांचा खिसा कापला. गरिबांचं शोषण हीच त्यांची रणनीति आहे. परंतु, आता तसं होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती बदलेल.