पीटीआय, बंगळूरु
ईडी’ आणि आयकर विभागाच्या छाप्यांचा धाक दाखवून मोठे व्यापारी आणि कंत्राटदारांकडून वसुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केला. कर्नाटक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे हा पक्ष आतापासूनच कारणे शोधत आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. आयकर विभागाने कर्नाटकमधील मोठे व्यापारी आणि कंत्राटदारांवर छापे टाकून नुकतीच कोटय़वधींची संपत्ती जप्त केली आहे. व्यापाऱ्यांकडील काही रक्कम आगामी निवडणुकांत काँग्रेससाठी वापरण्यात येणार होती, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका केली.
हेही वाचा >>>शरद पवार यांचे नव्हे, तर पंतप्रधानांचे अदानींना संरक्षण; राहुल गांधी यांचा आरोप
मिझोरामसाठी भाजपची १२ उमेदवारांची यादी जाहीर
मिझोराममधील विधानसभेच्या १२ जागांसाठी भाजपने बुधवारी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. येथे ७ नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. अन्य स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपने छत्तीसगडमधील पंडारिया विधानसभा मतदारसंघासाठी भावना बोहरा यांची उमेदवारी जाहीर केली. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांचा समावेश असलेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली.
राजस्थान, मध्य प्रदेशसाठी उमेदवारांबाबत काँग्रेसची चर्चा
आगामी राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांनी विचारविनिमय केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या निवडणुकीत दोन्ही राज्यांत आपला पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. राजस्थान आणि मध्य प्रदेशसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. राहुल गांधी राजस्थान काँग्रेस समितीच्या बैठकीत सहभागी झाले होते; परंतु तेलंगणला प्रचारफेरीत भाग घ्यायचा असल्याने राजस्थान काँग्रेस समितीच्या बैठकीत ते सहभागी झाले नाहीत. गेल्या पाच वर्षांतील सुशासनाच्या बळावर पक्ष राजस्थानमध्ये पुन्हा विजय मिळवेल, असा विश्वास खरगे यांनी या वेळी व्यक्त केला. खरगे यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की काँग्रेसच्या सुशासनामुळे विकास, वृद्धी, बचत, मदतीचे धोरण, सुरक्षितता आदी पैलूंनी राजस्थानची वाटचाल झाली. राजस्थान आमूलाग्र बदलला. आम्हाला खात्री आहे की जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल.
हेही वाचा >>>अवयवदानाच्या संकल्पात महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर; संकेतस्थळावरील आकडेवारीतील चित्र
‘जनसेना’शी आघाडीचा भाजपचा प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणुकीत जनसेना पक्षाशी आघाडी करण्यासाठी तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि खासदार के. लक्ष्मण यांनी बुधवारी ‘जनसेना’चे संस्थापक आणि अभिनेते पवन कल्याण यांच्याशी बुधवारी चर्चा केली. पवन कल्याण यांनी सांगितले की, निवडणुकीत ११९ पैकी किमान ३० मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आमदाराची बंडखोरी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी अंतागड मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार अनुप नाग यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.