पीटीआय, मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला कुस्तीगिरांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय गुरूवारी येथे झालेल्या खाप महापंचायतीमध्ये घेण्यात आला. कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आरोपांबाबत कारवाईसाठी पुन्हा एकदा इशारा देण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट हे आघाडीचे कुस्तीगीर गंगा नदीमध्ये आपली पदके विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. त्यावेळी भारतीय किसान संघटनेचे नेते नरेश टिकैत यांनी त्यांचे मन वळविले. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी गुरूवारी खाप महापंचायत बोलाविली होती. ते स्वत: ‘बलियान खाप’चे नेते असून या महापंचायतीला पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली येथील खाप नेते उपस्थित होते. पंचायतीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले, की खाप पंचायतींचे एक शिष्टमंडळ लवकरच राष्ट्रपती आणि सरकारची भेट घेऊन कुस्तीगिरांची बाजू त्यांच्यासमोर मांडतील. त्यानंतरही ब्रिजभूषण यांच्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल. शुक्रवारी
कुरूक्षेत्र येथे खाप महापंचायत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र राष्ट्रपतींची भेट नेमकी केव्हा घेणार, हे मात्र टिकैत यांनी जाहीर केलेले नाही.
ब्रिजभूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही खाप पंचायतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला जाहीरपणे बाजू मांडण्याची परवानगी दिली जात असताना सरकार यावर काहीही बोलण्यास तयार नाही, असा आरोप टिकैत यांनी केला. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले असून यातील अल्पवयीन महिला कुस्तिगिराच्या आरोपावरून दाखल गुन्हा ‘पोक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्यांदर्गत नोंदविण्यात आला आहे.

प्रीतम मुंडे यांचा वेगळा सूर

केवळ खासदार म्हणून नव्हे, तर महिला म्हणून कुस्तीगिरांबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाचे नेते ब्रिजभूषण यांचा अप्रत्यक्ष बचाव करत असताना मुंडे यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

‘पॉक्सो’वरून दावे-प्रतिदावे

ब्रिजभूषण यांच्याविरोधात ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला असतानाही त्यांना अद्याप अटक का झालेली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भाजप खासदार असलेले ब्रिजभूषण यांना वगळता अन्य सर्वाना पॉक्सो कायदा आणि तातडीने अटकेची अट लागू आहे का, असा सवाल राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी केला.

‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आरोपीला चौकशीसाठी तात्काळ अटक केली जाते, असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सांगितले.

दुसरीकडे अयोध्येतील साधू महंतांनी मात्र आता ‘पॉक्सो’ कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी पुढे केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींविरोधात या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या मागणीसाठी सोमवार, ५ जून रोजी देशभरातील साधू-संतांची परिषद भरविण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khap maha panchayat decision to appeal to the president regarding the wrestlers protests amy