Neelam Shinde Accident News: महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी निलम शिंदेहीचा अमेरिकेत एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला. कॅलिफोर्निया येथे १४ फेब्रुवारी रोजी निलम शिंदेला एका वाहनाने धडक दिली होती. निलमवर सध्या अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर निलमच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना व्हायचे आहे, यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर व्हावा, अशी तिच्या कुटुंबियांनी विनंती केली असून या विनंतीची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निलमचे वडील तानाजी शिंदे यांनी मदतीसाठी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणाले, १६ फेब्रुवारी रोजी आम्हाला अपघाताची बातमी समजली. तेव्हापासून आम्ही व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. पण अद्याप आम्हाला व्हिसा मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र खात्याला टॅग करून मदतीची विनंती केली आहे.

एनडीटीव्ही वाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही एक गंभीर घटना असून शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे. तसेच शिंदे कुटुंबियांशी आपला संपर्क झाला असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे भाजपाचे असून आमच्यात राजकीय मतभेद असले तरी अशा अडचणीच्या प्रसंगी ते मदत करण्यास कचरत नाहीत. जेव्हा जेव्हा विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांवर काही अडचण येते, तेव्हा ते मदतीसाठी पुढे येतात. परराष्ट्र खात्याच्या मदतीचा मला चांगला अनुभव आहे. विदेशातील भारतीयांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात.

दरम्यान शिंदे कुटुंबियांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, अपघातामध्ये निलमच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तसेच तिच्या वर्गमैत्रिणींनी आम्हाला १६ फेब्रुवारी रोजी अपघाताची माहिती दिली.

निलम शिंदेचे काका संजय कदम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, रुग्णालयाने निलमच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी आमची परवानगी घेतली. ती सध्या कोमात आहे आणि अशा कठीण प्रसंगी आमचे तिथे असणे गरजेचे आहे. रुग्णालयाकडून तिच्या प्रकृतीविषयी आम्हाला रोज माहिती दिली जात आहे, असेही कुटुंबियांनी सांगितले.

ताजी अपडेट

माध्यमांमध्ये नीलम शिंदेबाबत बातमी पसरल्यानंतर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही पुढाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अखेर अमेरिकन दूतावासाने नीलम शिंदेचे वडील तानाजी शिंदे आणि दोन भावांना व्हिसा मंजूर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना नीलमचे वडील तानाजी शिंदे म्हणाले, “खूप प्रयत्न केल्यानंतर आता आमचा व्हिसा मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील अनेकांनी आम्हाला यासाठी मदत केली.” यावेळी नीलमच्या भावाने सांगितले की, ताशी १२० किमीच्या वेगाने येणाऱ्या वाहनाने तिला मागून जोरदार धडक दिली. यात हात-पाय आणि डोक्याला जबर मार लागल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. दोन सर्जरी केल्यानंतरही रक्तस्त्राव थांबत नव्हता. तिच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी आम्हाला तपशील कळवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांचे ओएसडी आमच्या संपर्कात होते. त्यामुळे आम्हाला व्हिसा मिळण्यात मदत झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra sataras student neelam shinde in coma after us accident family seeks urgent visa kvg