Shashi Tharoor : देशभरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चांच कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली-एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडण्याचे आणि निवारा केंद्रांमध्ये ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशातील अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत तोडगा सुचवला आहे. खासदार शशी थरूर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये आपल्या व्यवस्थेत दोष असल्याची टीका करत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नेमकं काय तोडगा काढला पाहिजे? यावर शशी थरूर यांनी काही उपाय सुचवले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

खासदार शशी थरूर काय म्हणाले?

शशी थरूर यांनी म्हटलं की, “भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता नाही. परंतु स्थानिक संस्था या पैशाचा योग्य वापर करत नाहीत. बऱ्याच वेळा हे पैसे खर्च केले जात नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणी वापरले जातात. नसबंदी आणि निवारा या सारख्या योजना राबवण्यात नगरपालिका अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे हे पैसे प्राणी कल्याण आणि नसबंदी यासाठी ज्या संस्था (एनजीओ) चांगलं काम करत आहेत त्यांना दिले पाहिजे”, असं मत शशी थरूर यांनी व्यक्त केलं आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांबद्दल मोठा निर्णय दिला आहे. या भागातील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशात नगरपालिका आणि इतर यंत्रणांना निर्धारित वेळेत पुरेशी निवाऱ्याची व्यवस्था उभारण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि सार्वजनिक ठिकाणांहून भटकी कुत्री हटवली जातील याची खात्री करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी

दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी लक्ष घालण्याची हमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशावर आक्षेप घेत एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर गवई यांच्या समोर ही बाब मांडली. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आक्षेप घेतला, ज्यात सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “पण, या प्रकरणी दुसऱ्या खंडपीठाने आधीच आदेश दिले आहेत. मी यामध्ये लक्ष घालेन.”