मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. मात्र,आर्यन खान सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. पण, आता अशी माहिती समोर आली आहे की, आर्यन खान तुरुंगात असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला पत्र लिहून देश तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत प्रोत्साहन दिले होते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. राहुल गांधींनी १४ ऑक्टोबरला हे पत्र लिहले होते. 

३ ऑक्टोबर रोजी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जच्या संदर्भात क्रूझवर छापा टाकत एनसीबीने अटक केली होती. यानंतर आर्यन ८ ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात बंद होता. आर्यन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तुरुंगातून जामीनावर बाहेर आला.

ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव समोर आल्यानंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आर्यन खानच्या समर्थनार्थ उभे राहिले. सलमान खान, हृतिक रोशन आणि चित्रपट निर्मात्या फराह खान यांनी शाहरुक खानला धीर दिला होता. या प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटा सुरु ठेवला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर करण्यापूर्वीच विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी शनिवारी मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी नऊ आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला.

एनसीबीने अचित कुमारला २.६ ग्रॅम गांजासह अटक केली होती. तो आर्यन खानसोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅट करत असल्याचा दावाही एनसीबीने केला होता. अचित कुमार हा ड्रग्ज सप्लायर असून तो गांजाचीही तस्करी करतो, असा दावा एनसीबीने केला होता. पण आचितच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना असे म्हटले की, “एनसीबीने पुराव्यांचा कोणताही आधार नसताना आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांचा कुमारवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्याचे करिअरवर याचा प्रभाव पडू शकतो.”

एनसीबीच्या मते, आचित कुमार हा ड्रग्जचा पुरवठादार असून तो ड्रग्जचा पुरवठा करण्याच्या व्यवसायात आहे. मात्र याबद्दलचा कोणताही पुरावा सादर करण्यास एनसीबी अपयशी झाली आहे. “त्यांच्याकडे आर्यन खानसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वगळता ठोस कोणताही पुरावा नाही. तसेच आचित कुमार या सर्व प्रकरणात गुंतलेला असल्याचे दाखवणारा पुरावाही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सच्या आधारे कुमार आरोपींना ड्रग्ज पुरवत होता, असं म्हणणं चुकीचे आहे,” असे सांगत कोर्टाने आचित कुमारला जामीन मंजूर केला होता.