पीटीआय, नवी दिल्ली
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्याला डोळ्यासमोर ठेवून ६२ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन केले. त्यामध्ये प्रामुख्याने ६० हजार कोटींच्या गुंतवणुकीसह केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रायोजित ‘प्रधानमंत्री स्कीलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपडेटेड आयटीआय’ (पीएम-सेतू) योजनेचा समावेश आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बिहारवर भर देण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारतातील ‘आयटीआय’ केवळ औद्योगिक शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र नाहीत तर ‘आत्मनिर्भर भारत’साठी कार्यशाळा म्हणूनही काम करतात, उद्योग कौशल्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि पुढील दहा वर्षांत भविष्यातील मागण्यांचा अंदाज घेण्यासाठी ‘आयटीआय’चे जाळे उभारले जात असल्याची माहिती मोदी यांनी दिली.

यावेळी मोदींनी बिहारची सुधारित ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना’देखील सुरू केली. या योजनेअंतर्गत सुमारे पाच लाख पदवीधरांना मासिक १,००० रुपये भत्ता आणि दोन वर्षांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेद्वारे ४ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त शिक्षण कर्ज दिले जाईल. मुख्यमंत्री मुले-मुली शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी आणि १० वीच्या २५ लाख विद्यार्थ्यांना ४५० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राजद आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. बिहारमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचे प्रमुख कारण राजदच्या राजवटीत ‘शिक्षणाची वाईट स्थिती’ असल्याची टीका केली. परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राज्याला प्रगतीच्या मार्गावर आणल्याबद्दल नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने राबवलेल्या योजनांची त्यांनी प्रशंसा केली.

बिहार सरकारने राज्याच्या विकासासाठी नवीन आश्वासने दिली आहेत आणि गेल्या २० वर्षांच्या तुलनेत पुढील पाच वर्षांत रोजगार देणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने, बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर शासनाची जबाबदारी सोपवली आणि आघाडी सरकारने एकत्रितपणे काम केले जेणेकरून रुळावरून घसरलेली व्यवस्था पुनर्संचयित होईल. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सन्मान चोरण्याचा प्रयत्न

भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांचा ‘जननायक’ हा सन्मान चोरण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. अशा लोकांपासून बिहारच्या जनतेने सावध असावे, असा सल्लाही दिला. काँग्रेस सदस्य अनेकदा राहुल गांधी यांचा उल्लेख ‘जननायक’ असा करतात. कर्पूरी ठाकूर यांना समाजमाध्यमातील प्रशंसकांनी ही पदवी दिली नव्हती तर ते लोकांचे त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतिबिंब असल्याचे मोदी म्हणाले.