छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : ‘बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तोपर्यंत शिवसेनेतील चित्र वेगळे होते. बाळासाहेबांचे सगळीकडे बारीक लक्ष असायचे. परंतु, ते गेले आणि पक्षाची अवनती होत गेली. पुढे ही अवनती इतकी झाली की निष्ठा वगैरे हा विषयच संपला. दोन मर्सिडीज द्या आणि एक पद मिळवा. असा सरळ व्यवहार सुरू झाला’, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी आयोजित ‘असे घडलो आम्ही’ या मुलाखत सत्रात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याही मुलाखती झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, २०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळाले याचा आम्हाला आनंद झाला होता. पण, पुढे पक्षाचे चित्र आणखी वाईट होत गेले. आमदारांना भेटी मिळणे बंद झाले. कुठल्याही विषयासाठी भेट मिळत नव्हती. करोनाकाळात तर दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर चाचणी केली तरीही भेट मिळत नव्हती. हे असेच होणार असेल, तर स्थित्यंतरं काय कामाचे? असा प्रश्नही नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला.

शिंदेचे पक्षातील महत्त्व किती होते, हे सांगताना नीलम गोऱ्हे यांनी एक उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचे काही कारण नाही. २०१२ वगैरेपर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. ते ठाण्याहून आणले जायचे. इतके करूनही नेत्यांनाच संपर्क नको असेल तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. यावेळी त्यांनी कथा-कवितेचा बालपणीच कसा लळा लागला, त्यांची महापालिकेची शाळा, शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन या आठवणींनाही उजाळा दिला.

मी राजकारणाच्या लहरीपणाचा बळी- सुरेश प्रभू

माझ्या राजकीय कारकीर्दीकरिता बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे. परंतु, अनेकदा मी राजकारणाच्या लहरीपणाचा बळी ठरलो, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली. मधु दंडवते यांच्याविरुद्ध निवडणूक लढणे ही माझ्या आयुष्यातील घोडचूक होती. ते जर निवडून आले असते तर त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होऊ शकला असता. मी निवडून आल्यापेक्षा मधु दंडवते हरले याचे दु:ख माझ्या मनात कायमच राहणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले.

दरबारी राजकारण हे दिल्लीतील वास्तव- पृथ्वीराज चव्हाण

दरबारी राजकारण हे दिल्लीतील वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही. हा दिल्लीच्या आजूबाजूच्या संस्कृतीचा प्रभाव असेल कदाचित. मी मूळचा मराठी असल्याने मला दिल्लीच्या संस्कृतीत रुळायला सुरुवातीला जरा अडचण गेली, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पुढचे राजकारण मुंबईत करायला आवडेल की दिल्लीत? याचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, दिल्लीलाच माझे प्राधान्य असेल. कारण, इथले सगळे विषय वेगळे आहेत. विषयांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे सगळे आयाम असतात. मराठी माणसाने महाराष्ट्रातून येऊन दिल्लीत नेतृत्व करावे, असे वाटत असले तरी महाराष्ट्रातील व्यापांमुळे ते अनेकदा शक्य होत नाही, असेही चव्हाण म्हणाले.

महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी सर्वच पक्षात आपले चांगभलं करून घेतले. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांबद्दल आता काय बोलावे.– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

चार वेळा शिवसेनेकडून आमदारकी मिळवणाऱ्या गोऱ्हे यांनी आतापर्यंत किती मर्सिडीज दिल्या. त्याचा हिशेब द्यावा.– संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना

पुण्यातील शिवसेनेची ‘बापट सेना’ करण्यात गोऱ्हे यांचा मोठा हात आहे. गोऱ्हे या ‘मातोश्री’वर पडिक असायच्या.– सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe revelation about thackeray shiv sena group amy