Pariksha Pe Charcha 2023: कॉपीबहाद्दरांना मोदींचा टोला आणि अँकरची घेतली शाळा; एकनाथ शिंदेसह फडणवीसही हसून लोटपोट | pariksha pe charcha 2023 PM narendra Modi interacts with student eknath shinde devendra fadnavis enjoys speech | Loksatta

Pariksha Pe Charcha 2023: कॉपीबहाद्दरांना मोदींचा टोला, सूत्रसंचालकाची घेतली शाळा; एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनाही हसू आवरले नाही

Pariksha Pe Charcha 2023: विद्यार्थ्यांना हसत खेळत मार्गदर्शन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात अधून मधून विनोदाची पेरणी केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांसहीत सर्वांचेच मनोरंजन झाले.

pariksha pe charcha pm narendra modi
Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.

Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तालकटोरा स्टेडियममध्ये २०० विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. तर देशभरातून या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी सखोल उत्तरे दिली. यावेळी कॉपीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मोदींनी विनोदी पद्धतीने उत्तर दिले ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र यावेळी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची चर्चा व्हावी, म्हणून यावर्षी हा कार्यक्रम लवकर आयोजित करण्यात आला.

कॉपीबहाद्दरांना मोदींचा सल्ला

“कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”, असा संदेश मोदी यांनी दिला.

ही बातमी वाचा >> “तुम्ही रील्स बघता का? मी पण मोबाईलमध्ये…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला भारतासमोरील चिंतेचा विषय

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाही हसू आवरले नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथून तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरहून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहत होते. कॉपी करण्याच्या विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या मार्गावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी विनोद केल्यानंतर दोघांनाही हसू आवरले नाही. एकनाथ शिंदे हे मोदींच्या विनोदाचा चांगलाच आनंद घेताना दिसले. तर फडणवीस यांनाही हसू आवरत नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सूत्रसंचालकावर विनोद

विद्यार्थ्यांना विषय समजावा, तसेच ते कंटाळू नयेत यासाठी पंतप्रधान मोदी देखील अधून मधून विनोदाची पेरणी करत होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन सूत्रसंचालक विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. आपले निवेदन झाल्यानंतर मोदी पुढच्या प्रश्नांसाठी तयार होते, मात्र सूत्रसंचालक स्टेजवर उपलब्ध नव्हते. त्यावेळी मोदी म्हणाले की, “अरे भाई अँकर कहा गये?” मोदींच्या या प्रश्नानंतर विद्यार्थी सूत्रसंचालक घाईघाईत स्टेजवर आले आणि प्रश्न विचारु लागले, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्यानंतर मोदींना सूत्रसंचालकाला तो प्रश्न पुन्हा सांगण्याची विनंती केली. त्यावेळी छोटीशी विद्यार्थीनी बुचकळ्यात पडली आणि प्रश्नच विसरुन गेली होती. अशाप्रकारे पंतप्रधनांनी सूत्रसंचालकांचीही यावेळी शाळा घेतल्याचे दिसून आले.

ही बातमी वाचा >> पंतप्रधान लिखित पुस्तक विद्यार्थ्यांना वाटा! प्रशासनाच्या शाळांना सूचना

वेळेचे नियोजन करा आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये, यासाठी मोदी यांनी क्रिकेटमधील फलदांजाचे उदाहरण दिले. “क्रिकेट सामना पाहताना लोक चौकार – षटकार असे ओरडत असतात. पण फलंदाज काही लोकांचे ऐकून फलंदाजी करत नाही. तो जसा चेंडू येईल तशी फलंदाजी करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:19 IST
Next Story
Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद; ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर नागपुरातून फडणवीसांचीही ऑनलाईन ‘हजेरी’!