US Claim On India and Pakistan De-escalation: मंगळवारी एका अमेरिकन राजदूताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील “तणाव कमी” करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले आहेत. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचे दावे वारंवार करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारने ट्रम्प यांचे हे दावे सातत्याने नाकारले आहेत.

अमेरिकेच्या कार्यवाहक प्रतिनिधी राजदूत डोरोथी शिया यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेच्या नेतृत्वाने “इस्रायल आणि इराण, काँगो आणि रवांडा लोकशाही प्रजासत्ताक व भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थाची भूमिका पार पाडली आहे”.

दरम्यान, अमेरिकन राजदूतांनी हा दावा केला तेव्हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्ष होते. यावेळी अमेरिकन राजदूतांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आणि म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालीच अमेरिकेने युद्धबंदी आणि शस्त्रविरामासाठी अनेक देशांना प्रोत्साहित केले.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी, भारताने ७ मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. याचबरोबर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. तसेच सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर दोन्ही देशांमधील लष्करी तणाव वाढत गेला. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराने भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले, जे भारतीय लष्कराने परतावून लावले. भारत आणि पाकिस्तानमध्ये १० मे रोजी शस्त्रविराम करार झाला आणि तेव्हापासून, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला आहे की, त्यांनी मध्यस्थी केल्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाला.

दरम्यान, ट्रम्प आणि अमेरिका असे दावे करत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने सातत्याने त्यांचे दावे फेटाळून लावत, हा द्विपक्षीय प्रश्न असल्याचे म्हटले आहे.