नवी दिल्ली : संविधानाचा आदर करत असल्याचे दाखवणारे सत्तेत असताना अन्याय्य कायदे करत होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये दोन महामार्गांचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात भाषण करत होते.

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, “पूर्वीची सरकारे दिल्लीतील सफाई कर्मचाऱ्यांना गुलामाप्रमाणे वागवत. कोणी पूर्वसूचना न देता कामावर आले नाही तर त्यांना एक महिना तुरुंगात ठेवण्याची दिल्ली महापालिका कायद्यामध्ये तरतूद होती. आज सामाजिक न्यायाबद्दल मोठमोठी वक्तव्ये करणाऱ्या विरोधी पक्षांनी देशात असे अनेक नियम आणि कायदे राबवले,” असे मोदी यांनी सांगितले. आपले सरकार असे प्रतिगामी कायदे शोधून ते रद्द करत आहे, असे शेकडो कायदे आम्ही रद्द केले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू आहे असे पंतप्रधान म्हणाले.

भाजपला दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मिळालेले यश विरोधी पक्षांना पचवता येत नाही अशी टीकाही मोदी यांनी केली. हे पक्ष जनतेचा विश्वास आणि वास्तव यापासून दूर आहेत असे ते म्हणाले.

जे लोक डोक्यावर संविधानाची प्रत घेऊन नाचत आहेत, त्यांनी सत्तेत असताना अन्याय्य आणि प्रतिगामी कायदे करून संविधान पायदळी तुडवले. या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावनेला धोका दिला. नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान

११,००० कोटींच्या महामार्गांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली भाग आणि शहर विस्तार मार्ग-२च्याच अलिपूर ते दिचाव कलान या दोन महामार्गांचे रविवारी उद्घाटन केले. या दोन्ही प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे ११ हजार कोटी रुपये इतका आला. दिल्ली आणि सभोवातलच्या प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे महामार्ग बांधण्यात आले आहेत. या बांधकामांमध्ये लाखो टन कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात आल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी हेही यावेळी उपस्थित होते.

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीत सहकार्याचे आवाहन प्रस्तावित ‘जीएसटी’ सुधारणा राबवण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मोदी यांनी या कार्यक्रमात केले. दिवाळीपूर्वी लागू करावयाच्या या ‘जीएसटी सुधारणांचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होणार आहे असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना, पंतप्रधानांनी दिवाळीत सुधारित ‘जीएसटी’ची भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासन आहे असे ते रविवारी म्हणाले.