PM Modi Talking On Straights Batting And Swing Ball: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) मुळे भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, समुद्री खाद्य आणि अभियांत्रिकी वस्तूंसाठी ब्रिटनमधील बाजारपेठेत आणखी स्थान मिळणार असल्याचे म्हटले आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “या करारामुळे भारतातील कृषी उत्पादनांसाठी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगासाठी नवीन संधीही उपलब्ध होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा करार भारतातील तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस घटकांसारखी यूके-निर्मित उत्पादने भारतीय ग्राहक आणि उद्योगांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारी होतील.”
आपण नेहमीच स्ट्रेट बॅटने…
दरम्यान, या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच शाब्दिक टोलेबाजी केल्याचेही पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, “भारत आणि यूके एकत्र येत असताना, विशेषतः जेव्हा दोन्ही देशांमध्ये कसोटी मालिका सुरू असते, तेव्हा क्रिकेटचा उल्लेख न करणे मला चुकीचे वाटते. दोन्ही देशांसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर ती एक जिव्हाळ्याची गोष्ट आहे. हे आपल्या भागीदारीचं उत्तम प्रतीक देखील आहे. कधी कधी चेंडू स्विंग होतो, चुकतो, पण आपण नेहमीच स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दोघेही एका मजबूत, उच्च धावसंख्येच्या भागीदारीसाठी कटिबद्ध आहोत.”
क्रिकेटमध्ये “स्ट्रेट बॅट”ने फटके खेळणे म्हणजे एक फलंदाजी तंत्र आहे, ज्यामध्ये फलंदाज बॅटचा समोरचा भाग सरळपणे येणाऱ्या चेंडूकडे वळवतो आणि तो आपल्या शरीराच्या रेषेत ठेवतो, जेणेकरून चेंडू जमिनीवर खेळता येईल. हा फलंदाजीचा अत्यंत शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य असा प्रकार मानला जातो, विशेषतः बचावात्मक फटक्यांसाठी.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘स्ट्रेट बॅट’ने फलंदाजी या विधानाद्वारे असे सुचवले की, भारत प्रामाणिक, थेट आणि सरळ संवादाला महत्त्व देतो.
दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी यूकेमध्ये असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टिप्पणीला संदर्भात्मक महत्त्व देखील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी बकिंगहॅमशायर स्ट्रीट क्रिकेट हबमधील खेळाडूंशीही संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी तरुण खेळाडूंना टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची स्वाक्षरी असलेली बॅट देखील दिली. याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.